PBKS vs CSK IPL 2021: आयपीएल (IPL) 2021 च्या 8 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) पंजाब किंग्जविरुद्ध (Punjab Kings) सामन्यात शानदार कामगिरी केली. चाहरने आपल्या 4 ओव्हरमध्ये 3.20 च्या इकॉनमी रेटने 4 विकेट आपल्या नावावर केल्या. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हर देखील टाकली. यासह 2017 मध्ये आयपीएल पदार्पण करणाऱ्या दीपकने सामन्यात विक्रमांची भडीमार केला आहे. चाहरने एक नाही तर आपल्या चार ओव्हर दरम्यान अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. 2017 मध्ये पदार्पणानंतर चाहर आयपीएलच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 36 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. चाहरनंतर असा पराक्रम करणारा उमेश यादव दुसऱ्या स्थानावर आहे पहिल्या सहा ओव्हरमध्ये आजवर एकूण 25 विकेट्स घेतल्या आहेत. चाहरने मयंक अग्रवाल, क्रिस गेल, दीपक हुड्डा आणि निकोलस पूरन यांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. (PBKS vs CSK IPL 2021: दीपक चाहरच्या घातक गोलंदाजीने मोडली पंजाब किंग्सची कंबर, चेन्नईला विजयाची 107 धावांची गरज)
दुसरीकडे, 2017 मध्ये पदार्पणानंतर चार आयपीएलमध्ये 14 फलंदाजांना शून्यावर बाद करणारा आघाडीचा गप;गोलंदाजही ठरला आहे. उमेश यादव हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा फलंदाजांना शून्यावर तंबूत पाठवलं आहे. उमेशने 2017 पासून खाते न उघडता 10 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. शिवाय, चाहरचे आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. यापूर्वी त्याने 15 धावांवर 3 विकेट घेतल्या होत्या. चाहर आता पंजाबविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजीची नोंद करणारा चेन्नईसाठी तिसर्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. सुपर किंग्सकडून आजवर लक्ष्मीपती बालाजीने (5/24) आणि त्यानंतर लुंगी एनगिडीने (4-10) अशी आकडेवारीची नोंद केली आहे.
दरम्यान, टॉस गमावून पहिले फलंदाजी करत पंजाबने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 106 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून शाहरुख खानने 47 धावांची खेळी केली तर चेन्नईकडून चाहरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. पंजाब आणि चेन्नई संघातील आजचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. याशिवाय, पंजाबविरुद्ध सामन्यात उतरताच चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने आपल्या नावावर मोठी कामगिरीची नोंद केली आहे. चेन्नईसाठी आजचा सामना धोनीचा 200वा सामना आहे. धोनीने आयपीएलमध्ये चेन्नईकडून 176 सामने तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 24 सामने खेळले आहेत.