Asia Cup 2020: भारताच्या आक्षेपानंतर पाकिस्तान नाही करणार आशिया चषक स्पर्धेचे आयोजन? वाचा सविस्तर
विराट कोहली आणि सरफराज अहमद (Photo Credit: Getty Images)

यंदाच्या आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान (Pakistan) कडून काढून घेण्यात आले आहे. भारताने (India) पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिल्यानंतर आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर्षी आशिया चषक टी-20 स्वरूपात सप्टेंबर महिन्यात खेळला जाणार आहे. पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतल्यावर आता आशिया चषक दुबई, बांग्लादेश (Bangladesh) किंवा श्रीलंका (Sri Lanka) येथे होऊ शकतात. ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषकच्या एक महिन्याआधी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा होणाऱ्या विश्वचषक टी-20 ची तयारी करण्यासाठी आशिया चषक यावर्षी टी-20 स्वरूपात खेळवला जाणार आहे. पाकिस्तानने 2008 एकदाच एशिया कप स्पर्धा आयोजित केली होती. त्या दरम्यान पाकिस्तानला फायनलमध्ये प्रवेश करता आले नाही आणि अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगला. अजंथा मेंडिसने 13 धावांवर 6 गडी बाद करत श्रीलंकेला 100 धावांनी जिंकून दिला होता.

या स्पर्धेत भारताने रेकॉर्ड सहा वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने पाच वेळा स्पर्धा जिंकली आहे. 2000 आणि 2012 मध्ये पाकिस्तानने दोनदा आशिया चषक जिंकला होता. एशिया कप प्रथम 1984 मध्ये झाला होता. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळली जाते. भारत-पाकिस्तान आजवर अंतिम सामन्यात कधीही आमने-सामने आले नाहीत.  2018 मध्ये दुबई (Dubai) मध्ये एशिया कप खेळला गेला, जो भारताने जिंकला. भारताने सलग दोनदा आशिया चषक जिंकला आहे. 2016 आशिया चषक स्पर्धेचे टी-20 स्वरूपात खेळली गेली होती आणि ही स्पर्धा सर्वात लहान फॉर्मेटमध्ये घेण्याची ही दुसरी वेळ आहे.

यासंदर्भातअद्याप कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. पाकिस्तान 12 वर्षानंतर हा चषक आयोजित करणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका आठ वर्षांपूर्वी 2012 मध्ये खेळली गेली होती. त्यावेळी पाकिस्तान भारत दौऱ्यावर आला होता. त्यानंतर, दोन्ही देशांनी केवळ विश्वचषक, टी-20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक अशा आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घेतला.