पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यावरही बांगलादेशने मजबूत पकड मिळवली आहे. पाकिस्तानने दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 172 धावा केल्या आणि विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं. चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला तोपर्यंत बांगलादेशची धावसंख्या ही 7 षटकांत बिनबाद 42 अशी होती. आता पाचव्या दिवशी आहे.  बांगलादेशच्या हातात 10 विकेट असल्याने त्यांचा विजय सोप्पा मानला जात आहे. बांगलादेशकडून झाकीर हुसेनने 23 चेंडूत  31 धावा तर शादाब इस्लाम  9 धावांवर खेळत होते.  (हेही वाचा - Pakistan vs Bangladesh, 2nd Test Day 4: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दुसरा डाव संकटात; 81 धावांवर 6 बाद)

उद्या जर बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला तर बांगलादेश संघ दुसऱ्या देशात खेळून पहिल्यांदा एखाद्या संघाला कसोटीत व्हाईटवॉश देणार आहे. तर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर मालिकेत बरोबरी होईल. हा सामना ड्रॉ झाला तरी पाकिस्तानला ही मालिका गमवावी लागणार आहे. पाकिस्तानसाठी ही मोठी नाचक्की ठरू शकते.

दरम्यान दुसऱ्या डावात पाकिस्तानने फक्त 172 धावा केल्या. दुसऱ्या डावात मोहम्मद रिझवान आणि अघा सलमान वगळता एकही फलंदाजी चांगली कामगिरी करू शकला नाही. मोहम्मद रिझवानने 43, तर अघा सलमानने 47 धावा केल्या आहेत. तर बांगलादेशकडून हसन महमुदने 5, नहिद राणाने 4 आणि तस्किन अहमदने 1 विकेट घेतली.

पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 274 धावा केल्या. बांगलादेशची प्रत्युत्तरात 6 बाद 26 अशी नाजूक स्थिती झाली होती. मात्र लिटन दास आणि मेहदी हसन मिराज याने तसं होऊ दिलं नाही.या दोघांनी खऱ्या अर्थाने मॅच फिरवली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी बांगलादेशच्या डावातील टर्निंग पॉइंट ठरला. बांगलादेशला पहिल्या डावात 78.4 ओव्हरमध्ये 262 धावा करता आल्या.