महेंद्र सिंह धोनी (Photo Credit: Getty Images)

On This Day in 2004: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये आजपर्यंत अनेक मोठी यशाची शिखरे गाठली आहेत. 23 डिसेंबर हा धोनी आणि त्याच्या चाहत्यांसाठी खास दिवस आहे. कारण याच दिवशी त्याने 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 डिसेंबर, 2004 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एंट्री केली होती. धोनीने आजच्या दिवशी 2004 मध्ये बांग्लादेशविरुद्ध (Bangladesh) वनडे सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. केनियामधील (Kenya) तिरंगी मालिकेत तसेच 2004 मध्ये झिम्बाब्वे येथे झालेल्या मालिकेत भारत अ संघाकडून क्लीन हिट करण्याच्या प्रदर्शनाने धोनीने जगाला चकित केले होते. त्याच्या भव्य फलंदाजीमुळे तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीचे लक्ष वेधले आणि 2004 मध्ये बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी त्याला भारतीय क्रिकेट संघात (Indian Team) संधी देण्यात आली. तथापि, महेंद्र सिंह धोनीच्या भारतीय पदार्पणाची सुरुवात चांगली झाली नाही. (Year-Ender 2020: एमएस धोनी ते मोहम्मद आमिर; 'या' अव्वल क्रिकेटपटूंनी यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम)

बांग्लादेशने चटोग्राममध्ये भारताविरुद्ध पहिले गोलंदाजी निवड केली आणि त्यांचा कर्णधार सौरव गांगुलीला 0 धावांवर माघारी धाडलं. राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफ यांनी 126 धावांची भागीदारी करुन दोन्ही फलंदाज अर्धशतकी कामगिरी केली. मात्र द्रविड 53 आणि श्रीधरन श्रीराम सलग बाद झाल्याने संघाला मोठा धक्का बसला. 42व्या ओव्हरमध्ये भारताचा स्कोर 180/5 असताना धोनी फलंदाजीला मैदानात उतरला. डावखुरा फिरकीपटू मोहम्मद रफिकचा सामना करत धोनीने आपला पहिला चेंडू स्क्वेअर लेगकडे मारला आणि वेगाने एकेरी धाव घेण्यासाठी धावला, मात्र कैफने नकार दिला आणि धोनी क्रीजमध्ये परतला. तपिश बैस्याने यष्टिरक्षक खालेद मशूदकडे जोरदार थ्रो फेकला आणि धोनी डेब्यूच्या वेळी शून्यावर माघारी परतला. श्रीधरन श्रीरामच्या 3/43 अशा शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने 11 धावांनी जिंकला, मात्र धोनीसाठी सुरुवात चांगली ठरली नाही. यानंतर, धोनीने विजागमध्ये पाकिस्तानविरुद्ध पाचव्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आणि यापासून त्याच्या महानतेच्या प्रवासाला सुरुवात झाली.

त्यानंतर धोनीने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला आणि संघाचे भविष्य कायमचे बदलले. आयसीसीच्या तिन्ही प्रमुख ट्रॉफी जिंकणारा धोनी क्रिकेट इतिहासातील एकमेव कर्णधार ठरला आणि त्याच्या काळात भारत नंबर 1 कसोटी संघही ठरला. भारताने धोनीबरोबर संघात चांगली कामगिरी सुरू ठेवली पण त्याच्या शेवटच्या वनडे सामन्यात दुःखद पुनरावृत्ती पाहायला मिळाली. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात धोनीने अर्धशतक झळकावत भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मात्र 49व्या ओव्हरमध्ये एक धाव घेताना धोनी अत्यंत इंचांने धावबाद झाला आणि भारत स्पर्धेतून बाद झाला. अशाप्रकारे, धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द धावबादने सुरु झाली आणि धावबादने संपुष्टात आली.