12 वर्षांपूर्वी जेव्हा युवराज सिंह च्या 6 षटकारांनी हादरले होते डरबन मैदान, आजही कायम आहे 'तो' विक्रम (Video)
File Photo

19 सप्टेंबर 2007... अगदी 12 वर्षांपूर्वी या दिवशी युवराज सिंह (Yuvraj Singh) याने इतिहास रचला होता. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 विश्वचषकमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या एका ओव्हरमधील चेंडूंवर युवराजने 6 षटकार ठोकले होते. युवराजच्या या कामगिरीने डरबानचे मैदान हादरून गेले होते. भारताच्या डावाचा अठरावी ओव्हर होती, अँड्र्यू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) गोलंदाजी करत होता आणि युवराजबरोबर त्याची बाचा-बाची झाली. फ्लिंटॉफने युवराजकडे अश्‍लील हावभाव केले, पण नंतर ब्रॉडला त्याचा परिणाम सहन करावा लागला. भारताच्या डावातील 19 वी ओव्हर. 19 व्या ओव्हरमध्ये युवराजने ब्रॉडचे सहाच्या सहा चेंडू सीमारेषेच्या बाहेर टाकले. तेव्हाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) क्रीजच्या दुसर्‍या टोकाला उभे राहून युवीला पाहतच राहिला.

युवराजने यावेळी फक्त 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, आणि आजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरूपात हा रेकॉर्ड अजूनही कायम आहे. युवीने 16 चेंडूत 58 धावा केल्या यात त्याने 7 षटकार आणि 3 चौकार लगावले. युवीच्या खेळीच्या जोरावर भारताने त्या सामन्यात 4 बाद 218 धावा केल्या आणि इंग्लंडचा 18 धावांनी पराभव केला. नंतर फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद जिंकले.

यावर्षी जून महिन्यात 37 वर्षीय युवराजने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने 304 वनडे सामन्यात 8 शतके आणि 52 अर्धशतकांसह 8701 धावा केल्या. त्याचबरोबर 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1177 धावा केल्या आहेत. शिवाय, 40 कसोटींमध्ये 3 शतके आणि 11 अर्धशतकांसह 1900 धावा केल्या आहेत. 2011 च्या विश्वचषकातही युवराजने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याला 'मॅन ऑफ द सीरिज' चा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी तो कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराशी झुंज देत होता, परंतु तरीही त्याने धैर्य गमावले नाही आणि त्याने बॉल आणि बॅट या दोन्हीने संघाच्या विजयात हातभार लावला. मात्र, त्यानंतर तो संघातून जास्त बाहेरच राहिला. 2015 च्या विश्वचषक संघातही त्याला स्थान मिळाले नव्हते.