NZ vs AUS 2nd T20I 2021: न्यूझीलंडचा (New Zealand) अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) बर्याच दिवसानंतर फॉर्ममध्ये परतला आहे. डुनेडिन (Dunedin) येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने तूफान फलंदाजी केली आणि मैदानावर चौकार व षटकारांचा पाऊस पाडला. गप्टिलचे शतक तीन धावांनी हुकले असले तरी त्याने रोहित शर्माला (Rohit Sharma) एका बाबतीत मागे टाकले. टीम इंडियाच्या 'हिटमॅन'ला मागे टाकत गप्टिल आता आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सध्या गप्टिलने 132 षटकार लगावले आहेत. गप्टिलने 50 चेंडूत 97 धावा केल्या. यादरम्यान त्याने चार चौकार आणि आठ तुफानी षटकार लगावले. इतकंच नाही तर गुप्टिल आता आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 2700 धावा पूर्ण करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज आणि जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. या प्रकरत ही रोहित अद्याप अव्वल स्थानी आहे. रोहितने 2773 धावा आहेत तर गप्टिलने आता 2718 धावा केल्या आहेत. (IPL 2021 लिलावात अनसोल्ड राहिलेल्या न्यूझीलंड फलंदाज Devon Conway याची स्फोटक खेळी, AUS विरुद्ध 59 चेंडूत केल्या तुफान 99 धावा)
गप्टिलने टी-20 मध्ये 16वे अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक आकडा गाठला. तथापि, त्याचे तिसरे शतक हुकले आणि मार्कस स्टोइनिसने त्याला डॅनियल सॅम्म्सकडे झेलबाद करत पॅव्हिलियनमध्ये पाठवले. दोन्ही खेळाडूंच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलायचे तर रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये 108 सामन्याच्या 100 डावांत 32.6 च्या सरासरीने 2773 धावा केल्या आहेत. टी -20 क्रिकेटमध्ये शर्माने चार शतके आणि 21 अर्धशतके केली आहेत. या स्वरुपात त्याची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी 118 धावा आहे तर, शर्माने टी -20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 127 षटकार ठोकले असून त्याने 245 चौकार लगावले आहेत. दुसरीकडे, किवी सलामीवीर मार्टिन गप्टिलने 96 टी-20 सामन्यात 32.0 च्या सरासरीने 2718 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. गुप्टिलने टी-20 स्वरूपात 132 षटकार तसेच 240 चौकारही खेचले आहेत.
A stunning return to form from Martin Guptill powered New Zealand to a thrilling four-run victory. #NZvAUS Report 👇https://t.co/SYw8Xv1YT3
— ICC (@ICC) February 25, 2021
दुसरीकडे, पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिका जिंकण्यासाठी किवी संघाला उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान एक सामना जिंकणे आवश्यक आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे टी -20 द्विपक्षीय मालिकेत न्यूझीलंड आजवर कधीही ऑस्ट्रेलियाचा पराभव करू शकलेला नाही. या दोघांमधील ही पाचवी मालिका आहे. ऑस्ट्रेलियाने 3 मालिका जिंकल्या असून एक मालिका अनिर्णीत राहिली होती. त्यामुळे, किवी संघाकडे टी-20 मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.