आयपीएल 2020 वर अद्याप कोणताही निर्णय नाही, कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान BCCI चं परिस्थितीवर लक्ष
रोहित शर्मा आणि एमएस धोनी (Photo Credit: PTI)

देशातील 21 दिवसांच्या कोविड-19 (COVID0-19) लॉकडाऊन अंतर्गत असल्याने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या नशिबात अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूत्रांनी सोमवारी सांगितले. कोविड-19 या जागतिक महामारीमुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाउन आहे त्यामुळे सध्या या लीगच्या आयोजनाबद्दल शंका कायम आहे. बोर्ड परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचेही बोर्डाच्या सूत्रांनी म्हटले. या महिन्याच्या सुरूवातीस, खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने आयपीएल (IPL) 15 एप्रिल पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. बीसीसीआयमधील सूत्रांनी एएनआयला सांगितले की, “आयपीएलबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, आम्ही परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत आणि त्यानुसार आम्ही एक निर्णय घेऊ.” भारतात सतत वाढणाऱ्या कोविड-19 च्या प्रसारामुळे यंदा आयपीएलचे आयोजन होणार की नाही यावर क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून आहे.

"बीसीसीआय आपल्या सर्व भागधारकांविषयी आणि सर्वसाधारणपणे सार्वजनिक आरोग्याबद्दल चिंता आणि संवेदनशील आहे आणि आयपीएलशी संबंधित सर्व लोकांना चाहत्यांसह सुरक्षित क्रिकेटचा अनुभव मिळावा यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत," असे बीसीसीआयने एका अधिकृत निवेदनात म्हटले होते. इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार बीसीसीआय आयपीएलचा 13 वा सत्र रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकते. आयपीएलमधील अर्धा वेळ निघून गेला असल्याने यंदा स्पर्धेचे आयोजन न केल्यास पुढील वर्षी मोठी लिलाव होणार नाही अशीही बातमी सध्या चर्चेत आहे.

तसेच क्रीडा मंत्रालयाशी एकत्रितपणे काम करेल आणि जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल असे आश्वासनही मंडळाने दिले. आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील सामान्यांपासून होणार होती, मात्र कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रसारामुळे स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित केली गेली.