New Guidelines For Team India Players: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BBCI) टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत कठोर भूमिका घेण्याच्या विचारात आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या परदेश दौऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. बोर्डाने नियमात केलेल्या बदलानुसार आता खेळाडूंच्या पत्नींना परदेशी दौऱ्यावर जास्त काळ पतीसोबत राहता येणार नाही.

भारतीय संघाची खराब कामगिरी-

टीम इंडियाच्या नुकत्याच झालेल्या कामगिरीनंतर बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचलले आहे. रोहित शर्मा आणि कंपनीसाठी गेले 3 महिने चांगले गेले नाहीत. प्रथम त्यांना घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून 3-0 ने आणि नंतर ऑस्ट्रेलियात 1-3 असा पराभव पत्करावा लागला. यासह टीम इंडिया प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावाही केल्या नाहीत. त्यानंतर आता आता बीसीसीआयने खेळाडूंसाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत.

नवीन नियम-

वृत्तानुसार, बीसीसीआयने परदेश दौऱ्यावर क्रिकेटपटूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत घालवण्याचा वेळ मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार, 45 दिवसांच्या दौऱ्यात खेळाडूंच्या पत्नी आणि कुटुंबीयांना जास्तीत जास्त दोन आठवडे राहण्याची परवानगी असेल. यापूर्वी, दौऱ्याच्या संपूर्ण कालावधीसाठी कुटुंबातील सदस्यांना खेळाडूंसोबत जाण्याची परवानगी होती. अहवालानुसार, बीसीसीआयने म्हटले आहे की यामुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होते.

बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अनुष्का शर्मा (विराट कोहलीची पत्नी) आणि अथिया शेट्टी (केएल राहुलची पत्नी) यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंच्या पत्नी उपस्थित होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, नवीन धोरणानुसार यापुढे त्यांना परवानगी दिली जाणार नाही. (हेही वाचा; Nitish Kumar Reddy: नितीश कुमार रेड्डीने गुडघ्यांवर चढल्या तिरुपती मंदिराच्या पायऱ्या; बॉर्डर गावस्कर मालिकेत दरमदार कामगिरीनंतर तिर्थस्थळी भेट)

सर्व खेळाडू एकत्र प्रवास करतील-

अजून एका नियमाद्वारे प्रत्येक खेळाडूने संघ बसने प्रवास करणे आवश्यक आहे, वेगळ्या बस प्रवासाला परवानगी नाही. गेल्या 2-3 वर्षांत अशा बातम्या येत होत्या की, टीम इंडियाचे काही खेळाडू टीमसोबत प्रवास ण करता वेगळा प्रवास करत आहेत. मात्र, आता असे होणार नाही. संघात एकता वाढवणे आणि उत्तम समन्वय सुनिश्चित करणे यासाठी सर्व खेळाडू एकत्रच एकाच वाहनाने प्रवास करतील. अलीकडच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा वेगळे प्रवास करताना दिसले होते, पण आता ही प्रथा बंद करण्यात आली आहे.