Sachin Tendulkar (PC - Twitter)

आगामी लोकसभा निवडणूक-2024 (Lok Sabha Elections-2024) च्या तयारीसाठी भारत निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. यावेळी निवडणूक आयोगाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी क्रिकेटमधील दिग्गज, भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) 'राष्ट्रीय आयकॉन' (National Icon) म्हणून निवड केली आहे. अशा प्रकारे यावेळी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या खेळपट्टीवर सचिन तेंडुलकर फलंदाजी करेल. सचिन तेंडुलकर निवडणूक आयोगासोबत 'नॅशनल आयकॉन' म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, गेल्या वर्षी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांची निवड केली होती. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रसिद्ध क्रिकेटपटू माजी कर्णधार एमएस धोनीची निवड झाली होती. त्याआधी अभिनेता आमिर खान आणि बॉक्सर मेरी कोम सारख्या दिग्गजांचीदेखील निवडणूक आयोगाद्वारे नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे.

आता सचिन तेंडुलकर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती आणि शिक्षणासाठी लोकांना प्रोत्साहित करणार आहे. यासाठी उद्या, 23 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्या उपस्थितीत रंग भवन, ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Asia Cup Squad: आशिया चषकासाठी राहुल अन् अय्यरचं कमबॅक; पाहा संपूर्ण संघ)

या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत 3 वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार केला जाणार आहे. विशेषत: तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने सचिनची निवड करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये, विशेषत: लोकसभा निवडणूक-2024 साठी मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे केले जात आहे. या भागीदारीद्वारे, निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट निवडणूक प्रक्रियेतील सर्वसामान्य जनता, विशेषत: तरुण आणि शहरी लोकांमध्ये निर्माण झालेली दरी भरून काढण्याचे आहे. अशा प्रकारे शहरी आणि तरुणांच्या मतदानाबाबत उदासीनतेची आव्हाने सोडवण्याचाही निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोग विविध क्षेत्रातील मान्यवर भारतीय व्यक्तींशी स्वतःला जोडून लोकशाहीच्या उत्सवात तरुणांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे.