Sachin Tendulkar हरवला कांदिवलीमध्ये, रिक्षाचालकाची मदत घेऊन योग्य रस्त्यावर लागला, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल खुश
सचिन तेंडुलकरच्या मदतीला आला मुंबईचा रिक्षाचालक (Photo Credit: Facebook)

मुंबई (Mumbai) शहरात अनेक ठिकाणी कामं सुरू असल्यामुळे अनेक रस्ते वनवण्यात येत आहेत ज्यामुळे सामान्य नागरिकांना नियमित प्रवासा दरम्यान मोठा फटका बसतो. पण, काही वेळापूर्वी याचा फटका महान क्रिकेटपटू आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) बसला. तेंडुलकरला वनवेमुळे घरी जायचा रस्ताच सापडत नव्हता, आणि कांदिवलीमध्येच (Kandivali) हरवला. अखेरीस मुंबईतला एक रिक्षावाला क्रिकेटच्या देवाच्या मदतीला धावून आला. रिक्षाचालकाच्या मदतीने सचिन योग्य रस्त्यावर पोहोचला. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सचिनने नुकतंच त्याच्या फेसबूक अकाउंटवर शेयर केला आहे. सचिनने या रिक्षाचालकाशी मराठीमध्ये संवाद साधला आणि त्याची विचारपूसही केली. दरम्यान, या व्हिडिओमध्ये सचिन मास्क न घालता दिसत आहे, त्याचे कारण म्हणजे हा व्हिडिओ नवीन नसून जानेवारी महिन्यातला आहे जो तेंडुलकरने आज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. (IND vs AUS 2020-21: स्टीव्ह स्मिथला आऊट कसे करावे? सचिन तेंडुलकरने भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपूर्वी गोलंदाजांना दिले टिप्स)

या व्हिडिओमध्ये सचिन म्हणतो की, "मी कांदिवली पश्चिममध्ये आहे. मोठ्या प्रमाणावर इथे काम सुरू असल्यामुळे मी रस्ता चुकलो आहे, त्यामुळे मी त्या रिक्षाचालकाला फॉलो करत आहे. त्याने मला फॉलो करा, असं सांगितलं, त्यामुळे मी त्याच्या मागोमाग जात आहे. हा रिक्षाचालक मला हायवेपर्यंत सोडणार आहे." मंगेश फडतरे, असं या रिक्षाचालकाचं नाव होतं. फडतरे यांनी सचिनला हायवे पर्यंत रास्ता दाखवला आणि मास्टर-ब्लास्टरसोबत एक सेल्फीही काढला. "मला एकट्याला हा रस्ता कधीच सापडला नसता," अशी कबुलीही सचिनने दिली. हा व्हिडिओ पोस्ट करताना सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, "गेल्या अनेक महिन्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण रस्ते शोधत प्रवास करतो, पण माणसाच्या मदतीला पर्याय नाही. जानेवारी महिन्यात रस्ता चुकल्यानंतर मंगेश यांनी मला मदत केली."

दुसरीकडे, क्रिकेटमधून निवृत्त झालेला सचिन सध्या सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत आहे. लॉकडाऊन दरम्यान घरच्यांसोबत वेळ घालवतानाचा व्हिडिओ असो किंवा आयपीएल दरम्यान मॅचबद्दल ट्विटरवर आपले मत प्रदर्शन करणे, मास्टर-ब्लास्टर सोशल मीडियावर यंदा अधिक सक्रिय असलेला दिसला.