Most T20I Runs in 2020: केएल राहुल याला मागे टाकत 40 वर्षीय पाकिस्तानी मोहम्मद हाफीजने यंदा टी-20 मध्ये केली कमाल
मोहम्मद हाफीज आणि केएल राहुल (Photo Credits: Facebook)

Most T20I Runs in 2020: न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तान (Pakistan) संघाने 4 गडी राखून विजय मिळवला आणि मालिका 1-2 ने संपुष्टात आणली. यंदाच्या 2020 मधील ही अंतिम टी-20 मालिका होती. या मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा ज्येष्ठ फलंदाज मोहम्मद हाफिजने (Mohammad Hafeez) कमाल केली आणि यंदा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीय फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) पहिले स्थान मिळवले होते, परंतु आता हफीजने त्याला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. यावर्षी टी-20 क्रिकेटमध्ये हाफिजने एकूण 415 धावा केल्या आहेत तर केएल राहुलने 404 धावा केल्या आहेत. हाफीजने न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात 41 धावा करत राहुलला मागे टाकले. त्याने 29 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. (Most T20I Runs for India in 2020: केएल राहुल यंदा सर्वाधिक धावा करत बनला भारताचा टी-20 'किंग', विराट कोहली 'या' स्थानी)

इंग्लंडचा डेविड मलान यावर्षी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 397 धावा करत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. टिम सेफर्टने 352 धावा करून चौथे स्थान पटकावले तर कतारच्या कामरान खानने 7 सामन्यात 335 धावा केल्या आणि पाचवे स्थान पटकावले. जॉनी बेयरस्टो 329 धावांसह सहाव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे पहिला 10 फलंदाजांच्या यादीत फक्त दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. राहुल दुसऱ्या तर कर्णधार विराट कोहली सातव्या स्थानावर आहे. विराटने यंदा खेळल्या 10 सामन्यात 295 धावा केल्या आहेत.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या आणि अंतिम सामन्यात हाफीजने 41 धावांच्या खेळीत एकूण 2 चौकार ठोकले. यासह त्याने यावर्षी टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 56 चौकार ठोकले आणि क्रिकेटच्या सर्वात कमी स्वरूपात यंदा सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या बाबतीत मलानची बरोबरी करत संयुक्तपणे अव्वल स्थान मिळवले. यादीत सेफर्टने 47 चौकार ठोकले तर राहुल आणि बेअरस्टो यांनी यंदा प्रत्येकी 46 चौकार मारले आहेत. शिवाय, हाफीजने 2020 मध्ये टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले. हाफीजने यंदा 20 षटकार मारले आहेत.