Most T20I Runs for India in 2020: वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यावर टी-20 मालिकेत 5-0 ने विजय मिळवत टीम इंडियाने (Team India) धमाकेदार सुरुवात केली आणि आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने (India Tour of Australia) 2-1ने टी-20 मालिका आपल्या नावावर केली. टीम इंडिया फलंदाजांनी दोन्ही मालिकांमध्ये विरोध संघावर वर्चस्व गाजवले आणि वर्षाची सुरुवातीसह शेवटही गोड केला. भारतीय फलंदाजांनी मागील काही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळपास प्रत्येक फॉरमॅटमध्ये आपली सत्ता गाजवली आहे. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा, शिखर धवन ही नावं सर्वांनाच परिचित आहेत, मात्र यामध्ये आता युवा खेळाडूंचीही भर पडत आहे. यंदा कोरोनाने प्रभावित झालेल्या वर्षात केएल राहुलने (KL Rahul) आपला सर्वश्रेष्ठ खेळ सादर केला आहे. राहुलने यंदा 11 टी-20 सामने खेळले आणि त्यात भारतासाठी सर्वाधिक 404 धावा केल्या आहेत. यंदा भारताकडून क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान राहुलने मिळवला आहे. (IND vs AUS: विराट कोहली नाही तर 'या' फलंदाजाने टीम इंडियासाठी वनडेत 2020 मध्ये केल्या सर्वाधिक धावा, रोहित शर्माने न खेळता रचला अनोखा विक्रम)
न्यूझीलंड दौरा,आयपीएल असो किंवा ऑस्ट्रेलिया दौरा राहुलच्या बॅटमधून यंदा धावांचा पाऊस पडला आहे. रोहित शर्माला यंदा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर मर्यादित ओव्हर मालिकेला मुकावे लागले होते. याचा सर्वाधिक फायदा राहुलला झाला आणि त्याने संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. याशिवाय, कर्णधार कोहलीही चांगला फॉर्ममध्ये होता. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये विराटने 10 सामन्यात 295 धावा केल्या आणि राहुलच्या मागे दुसरे स्थान पटकावले. यानंतर यादीत तिसऱ्या स्थानावर श्रेयस अय्यर विराजमान झाला. श्रेयसने 10 सामन्यात एकूण 203 धावा केल्या ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. भारताचा अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवनने 6 सामन्यात दोन अर्धशतकी खेळीसह 165 धावांची नोंद केली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी-20 मालिकेत बॅटने जबरदस्त कामगिरी बजावली. हार्दिक पांड्याने सर्वाधिक प्रभावित केले, तर भारताकडून पदार्पण करणाऱ्या यॉर्कर किंग टी नटराजनने संधीचं सोनं करत संघात आपले स्थान निश्चित करण्याकडे एक पाऊल टाकले. आयपीएलमधील कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी मिळालेल्या नटराजनने 3 टी-20 सामन्यात 6 कांगारू फलंदाजांना माघारी धाडलं. यामुळे, त्याला कसोटी संघात स्थान मिळण्यावरही चर्चा रंगली आहे.