ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) 2-1 कसोटी मालिका जिंकणार्या भारतीय संघाचा सदस्य मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आज हैदराबादला (Hyderabad) दाखल झाला आणि एअरपोर्टवरून भारतीय गोलंदाजाने थेट वडिलांच्या कब्रला भेट दिली. वडिलांच्या कब्रवर प्रार्थना करणाऱ्या सिराजचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 20 नोव्हेंबर रोजी सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाच्या एक आठवडापूर्वी भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाला पोहचला होता आणि कोरोना प्रोटोकॉलमुळे सिराज अंत्यदर्शनासाठीही परत येऊ शकला नाही. वडिलांच्या निधनानंतरही सिराजच्या प्रदर्शनात फारसा फरक पडला नाही आणि ऑस्ट्रेलियन दौर्यावर उत्कृष्ट कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सिराजने भारतासाठी सर्वाधिक 13 विकेट घेतल्या. ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात पाच विकेट घेण्याचीही सिराजने कामगिरी केली. (IND vs AUS 3rd Test 2021: सिडनी टेस्ट दरम्यान राष्ट्रगीत सुरु असताना टीम इंडियाचा तेजतर्रार गोलंदाज मोहम्मद सिराजला अश्रू अनावर, पहा हृदयस्पर्षी Video)
आपल्या मुलाने भारतीय संघात प्रतिनिधित्व केले पाहिजे हे सिराजच्या वडिलांचे स्वप्न होते. तथापि, आपली मुलाला भारतीय जर्सीत पाहण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्याला मायदेशी परतण्याचा पर्याय देण्यात आला होता परंतु या वेगवान गोलंदाजाने मालिकेसाठी संघाबरोबर राहणे निवडले. सिराजने मेलबर्नमधील बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यातून कसोटी पदार्पण केले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये राहिल्याचे मालिकेदरम्यान सिराजने बर्याच प्रसंगांदरम्यान खुलासा केला. सिडनी टेस्टपूर्वी राष्ट्रगीता दरम्यान वडिलांच्या आठवणींने सिराजचे डोळेही पाणावले होते. आपल्या वडिलांना शक्तीचा आधारस्तंभ मानणाऱ्या सिराजने वडिलांच्या कब्रवर फुलांच्या पाकळ्या घालून प्रार्थना केली आणि घरी जाण्यापूर्वी स्मशानभूमीत काही वेळ घालवला.
India's hero #Siraj paying homage at the grave of his father Mohd Ghouse who passed away when he was on tour outside the country; the son has returned after fulfilling the father's much cherished dream to see his son play for the country & make it win @ndtv @ndtvindia #MohdSiraj pic.twitter.com/X44GUc2WdX
— Uma Sudhir (@umasudhir) January 21, 2021
दरम्यान, सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील प्रभावी कामगिरीचं फळ मिळालं आणि इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. एक आठवडा हैदराबादमध्ये मुक्काम केल्यानंतर सिराज 27 जानेवारी रोजी चेन्नईसाठी रवाना होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथे खेळले जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी सिराजचा भारताच्या 18 सदस्यीय संघात समावेश आहे. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांच्यासह तो भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करेल.