Mohammed Siraj (Photo Credit - X)

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने क्रिकेटच्या मैदानाबाहेरही एक नवीन सुरुवात केली आहे. त्याने आपल्या हैदराबाद शहरात, बंजारा हिल्स परिसरात स्वतःचे पहिले रेस्टॉरंट उघडले आहे. या शानदार रेस्टॉरंटचे नाव ‘जोहारफा’ असे ठेवण्यात आले असून, त्याचे उद्घाटन 24 जून रोजी करण्यात आले. ‘जोहारफा’ रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारच्या चवींचा अनुभव घेता येणार आहे. येथे पाहुण्यांना मुघलाई, पारशी, अरबी आणि चायनीज पदार्थ दिले जातील. सिराजने याबद्दल बोलताना सांगितले, “हैदराबाद शहराने मला खूप काही दिले आहे, आता मला माझ्या शहराला काहीतरी परत द्यायचे आहे. ‘जोहारफा’ हे फक्त एक रेस्टॉरंट नसून, एक अनुभव असेल, जिथे लोकांना घरगुती चव आणि वातावरण मिळेल.”

या रेस्टॉरंटमध्ये अनुभवी शेफची टीम काम करेल आणि जेवणाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पारंपरिक चवींना येथे विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ज्यांना पारंपरिक भारतीय चवींसह जागतिक पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे एक खास ठिकाण ठरू शकते.

सिराजपूर्वी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली आणि झहीर खान यांसारख्या मोठ्या क्रिकेटपटूंनीही रेस्टॉरंट व्यवसायात पाऊल ठेवले आहे. आता सिराजनेही आपले रेस्टॉरंट उघडून या यादीत स्थान मिळवले आहे.

सिराजचा आतापर्यंतचा क्रिकेट प्रवास

37 वर्षीय मोहम्मद सिराजचा क्रिकेट कारकीर्द सातत्याने नव्या उंची गाठत आहे, पण आता त्याने आपल्या व्यावसायिक प्रवासात एक नवीन अध्याय जोडला आहे तो म्हणजे व्यवसायाचा. सिराजने आतापर्यंत भारतासाठी 37 कसोटी सामन्यांमध्ये 102 विकेट्स, 44 वनडे सामन्यांमध्ये ७१ विकेट्स आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या सिराज भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत तो सध्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकल्यानंतर, आता सिराज ‘जोहारफा’ रेस्टॉरंटद्वारे हैदराबादच्या लोकांची चवही जिंकू इच्छितो.