सूर्यकुमार यादव (Photo Credit: Twitter/mipaltan)

MI vs RCB, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 165 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 5 विकेटने विजय मिळवला आणि आयपीएल (IPL) 2020च्या प्ले ऑफ फेरीत स्थान निश्चित केले. आरसीबीविरुद्ध (RCB) लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) एकाकी झुंज दिली आणि नाबाद 79 धावा केल्या. आरसीबीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली, पण मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमारने एकहाती विजय मिळवून दिला. सूर्यकुमारऐवजी ईशान किशनने 25, क्विंटन डी कॉकने 18 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, आरसीबीसाठी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chaahl) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शिवाय, मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाने आरसीबीची प्ले ऑफ तिकीटाची प्रतीक्षा लांबणीवर गेली. (IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने पूर्ण केले आयपीएलमधील विकेटचे शतक, RCB कर्णधार विराट कोहली ठरला पहिला आणि 100 वा बळी)

आरसीबीने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक स्वस्तात झेलबाद झाला. 19 चेंडूत 18 धावा करून मोहम्मद सिराजने त्याला माघारी धाडलं. ईशान किशनला चांगली सुरूवात मिळाली पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर सौरभ तिवारीने सिराजच्या गोलंदाजीवर हवेत फटका लगावला. पण त्याचा अंदाच चुकल्याने चेंडू फारसा लांब जाऊ शकला नाही आणि देवदत्त पडिक्कलने पुढच्या दिशेने झेप घेत अप्रतिम झेल पकडला आणि सौरभला केवळ 5 धावांवर परतीचा मार्ग दाखवला. या दरम्यान, सूर्यकुमार एकाबाजूने लढा देत राहिला. त्याने 29 चेंडूत अर्धशतक ठोकले. फलंदाजीमध्ये बढती मिळालेला कृणाल पांड्याचा खराब फॉर्म यंदाही कायम राहिला आणि त्याला फक्त 10 धावाच करता आल्या. अखेर सूर्यकुमारला हार्दिक पांड्याची साथ मिळाली आणि दोघांनी मुंबईला विजयी रेषा ओलांडून दिली. सूर्यकुमार आणि हार्दिकमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. हार्दिक 17 धावा करून परतला.

यापूर्वी, पहिले फलंदाजी करताना बेंगलोरला 165 धावांपर्यंत मजल मारली. देवदत्त आणि जोश फिलीप यांनी दमदार सुरूवात केली, पण मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. जसप्रीत बुमराहने 14 धावांत 3 विकेट घेत आरसीबीच्या धावगतीला चाप लावला. पडीकलने एकाकी झुंज देत 45 चेंडूत 74 धावांची खेळी केली.