फाफ डु प्लेसिस (Photo Credits: Twitter)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13व्या हंगामाची सुरुवात दणक्यात झाली. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यातील सामन्यात एमएस धोनीने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत मुंबईच्या फलंदाजांना हैराण केले. पहिल्याच सामन्यात मुंबई आणि चेन्नईमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळाला. मुंबईकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरुवात केली. मात्र चौथ्या ओव्हरमध्ये पियूष चावलाच्या फिरकीत रोहित फसला आणि माघारी परतला. मात्र सगळ्यांचे लक्ष वेधले ते फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis). रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) 14व्या ओव्हरमध्ये फाफने दोन धक्का करणारे कॅच घेतले आणि मुंबईचे दोन धाकड फलंदाज सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांना माघारी धाडले जो मॅचचा 'टर्निंग पॉईंट' ठरला. हार्दिक आणि सौरभच्या विकेटने मुंबईला मोठा स्कोर करण्यापासून रोखले.

14व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर फाफने सीमारेषेवर कॅच घेत सौरभला माघारी धाडले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर हार्दिकचा झेल घेतला. हार्दिकने सामन्याची आक्रमक सुरुवात केली. मैदानात येताच त्यानं षटकार मारला, मात्र जडेजाच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात पांड्या बाद झाला. फाफने सीमारेषेवर हवेत उडी मारत अगदी सीमारेषेजवळ कॅच पकडून त्याला 14 धावांवर माघारी पाठवले. सौरभ आणि हार्दिकची विकेट महत्वाची ठरली. दोघे आक्रमकपणे फलंदाजी करत होते आणि एकेवेळी मुंबई इंडियन्स मोठा स्कोर करतील असे दिसत होते. पण, या दोंघाच्या बाद झाल्याने सीएसकेला मुंबईची धावसंख्येचा वेग रोखण्यात यश आले.

हार्दिक पांड्याचा कॅच

दरम्यान, मुंबईसाठी रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने दमदार सुरुवात केली. असे असूनही 48 धावांवर मुंबईचे दोन्ही सलामी फलंदाज बाद झाले होते. रोहित बाद झाल्यानंतर पुढील ओव्हरमध्ये लगेचच मुंबई इंडियन्सला दुसरा झटका बसला. पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर डी कॉक बाद झाला. सॅम कुर्रानने डी कॉकला बाद केले. क्विंटनने 5 चौकार मारत 20 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादव आणि सौरभने चांगली सुरुवात केली. मात्र सूर्यकुमार यादव 17 धावांवर बाद झाला. दीपक चाहरने सूर्यकुमार यादवला बाद केले. सौरभला वगळता मुंबईच्या अन्य फलंदाजांनी निराश केले. एकही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही.