KXIP vs DC, IPL 2020: शिखर धवनचे विक्रमी शतक व्यर्थ, दिल्ली कॅपिटल्सला 5 विकेटने पराभवाचा झटका देत किंग्स इलेव्हनने मिळवला तिसरा विजय
शिखर धवन आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

KXIP vs DC, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आयपीएलच्या (IPL) 38व्या सामन्यात पहिले फलंदाजी करून किंग्स इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) 165 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि 5 विकेटने विजय मिळवला. यासह किंग्स इलेव्हनने सलग तिसरा विजय मिळवला तर दिल्ली कॅपिटल्सचा हा स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला. दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबसाठी निकोलस पूरनने (Nicholas Pooran) सर्वाधिक 53 धावांचा डाव खेळला. क्रिस गेलने (Chris Gayle) 29 तर ग्लेन मॅक्सवेलने 32 धावांचे योगदान दिले. कर्णधार केएल राहुलने 15 धावा केल्या. दुसरीकडे, दिल्लीसाठी कगिसो रबाडाने 2, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आजच्या या विजयासह दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत 10 पैकी 7 सामन्यात व 3 पराभवात 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत, तर पंजाब 10 सामन्यात 4 सामन्यात विजय मिळवून 8 गुणांसह पाचव्या स्थानावर पोहचले आहेत. (KXIP vs DC, IPL 2020: शिखर धवनने सलग दुसरी सेन्चुरी करत केला दमदार विक्रम, 'हा' पराक्रम करणारा बनला पहिलाच फलंदाज)

लक्ष्याचा पाठलाग करताना अक्षर पटेलने कर्णधार राहूलला 15 धावांवर डॅनियल सॅम्सकडे झेलबाद करून पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर गेलने 13 चेंडूत 29 धावा केल्या आणि आर अश्विनच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. मयंक अग्रवाल 5 धाव करून रनआऊट झाला. पूरनसोबत चोरटी धाव घेण्याच्या गोंधळात मयंक स्वस्तात बाद झाला. त्यानंतर पूरने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक ठोकले आणि 53 धावा करून रबाडाच्या गोलंदावर विकेटकीपर रिषभ पंतकडे झेलबाद झाला. यानंतर मॅक्सवेल आणि दीपक हुडा यांनी विजयाच्या जवळ नेले असताना मोक्याच्या क्षणी मॅक्सवेल मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. रबाडाच्या चेंडूवर विकेटकीपर पंतने अप्रतिम झेल पकडून केएक्सायपी फलंदाजाला माघारी धाडलं. दीपक हुडा नाबाद 15 आणि जेम्स नीशम नाबाद 10 धावा करून परतले.

यापूर्वी, गेल्या तीन सामन्यात दोन अर्धशतक आणि शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने आजच्या सामन्यात देखील आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आणि दुबई येथे किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध शतकी खेळी केली. त्याने 61 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. धवनचे सलग दुसरे शतक ठरले. यापूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध देखील शतकी डाव खेळला होता. दरम्यान, धवन वगळता दिल्लीचा अन्य कोणताही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही. पंजाबकडून मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या, तर जेम्स नीशम, मॅक्सवेल, मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.