Hardik Pandya and KL Rahul. (Photo Credits: IANS)

कॉफी विथ करण सिझन 6 मध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने गोत्यामध्ये आलेले हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आणि के एल राहुल (KL Rahul) यांना आज BCCI चे लोकपाल डी के जैन यांनी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हार्दिक आणि के एल राहुल यांना 4 आठवड्याचा आत प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड जमा करणं बंधनकारक केलं आहे. अन्यथा त्यांच्या मानधनातून ती रक्कम कापून घेण्याचे आदेश आज देण्यात आले आहेत.

20 लाखांचा दंड

हार्दिक पांड्या आणि के एल . राहुल यांना आकारण्यात आलेला दंड हा शहीद निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना आणि अंध क्रिकेट असोसिएशनला निधी म्हणून दिला जाणार आहे. यामध्ये 10 शहीद निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाख तर अंध क्रिकेटच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी प्रत्येकी दहा लाखाची मदत केली जाणार आहे. येत्या चार आठवड्यात दोन्ही खेळाडूंना ही रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. KWK 6 Controversy: 'ओव्हर रिअ‍ॅक्ट करू नका' - हार्दिक पंड्या-केएल राहुलच्या बेताल वक्तव्याप्रकरणी राहुल द्रविडची प्रतिक्रिया

ANI Tweet

बॉलिवूड सिनेनिर्माता, दिगदर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के एल राहुल ही जोडी आली होती. दरम्यान बोलण्याच्या ओघात या दोन्ही खेळाडूंनी महिलांबद्द्ल आक्षेपार्ह व्यक्तव्य केली. त्याचे क्रिकेट विश्वापासून ते सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंवर सामन्यांची बंदी घालण्यात आली. BCCI ने पांड्या व राहुल यांना तात्पुरते निलंबित करून कालांतराने ती उठवली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकपालांनी नोटीस बजावून आपली बाजू मांडण्याचा वेळ दिला. त्याच्याअंती हार्दिक पांड्या आणि के एल राहुलला २० लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सध्या हार्दिक पांड्या आणि के एल राहुल आयपीएल 2019 मध्ये खेळत आहेत. या दोन्ही खेळाडूंचं नाव वर्ल्डकप 2019 साठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघामध्येदेखील आहे.