KKR vs DC, IPL 2020: वरुण चक्रवर्तीचा झंझावात, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाईट रायडर्सने 59 धावांनी मिळवला जबरदस्त विजय
कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

KKR vs DC, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) पहिले फलंदाजी करत दिलेल्या 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) 135 धावांपर्यंत मजल मारता आली आणि 59 धावांनी पराभव पत्करावा लागला. दिल्लीचा 11 सामन्यातील हा चौथा पराभव ठरला, तर कॅपिटल्सविरुद्ध विजयासह केकेआरने प्ले ऑफसाठी चौथ्या स्थानासाठी दावा ठोकला आहे. केकेआरने (KKR) 11 सामन्यात 6 विजय मिळवत 10 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये चौथे स्थान काबीज केले आहे. केकेआरने दिलेल्या मोठ्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) एकटा झगडत राहिला आणि सर्वाधिक 47 धावा केल्या. रिषभ पंतने 27 तर शिमरॉन हेटमायरने 10 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, केकेआर गोलंदाजांनी दिल्लीवर सुरुवातीपासून वर्चस्व कायम ठेवले. वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्सने 3 गडी बाद केले, तर लोकी फर्ग्युसनला 1 विकेट मिळाली. (KKR vs DC, IPL 2020: नितिश राणाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतकानंतर दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी, जाणून घ्या कारण)

दिल्लीकडून पहिल्यांदा सलामीला आलेल्या अजिंक्य रहाणेला लक्ष्यचा पाठलाग करताना कमिन्सने पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यूने बाद केले. त्यानंतर कमिन्सने इन-फॉर्म आणि सलग दोन शतकं करणाऱ्या शिखर धवनला बोल्ड करून कोलकाताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार श्रेयस आणि रिषभ पंत यांनी अर्धशतकी भागीदारीत करत संघाचा डाव सावरला, पण चक्रवर्तीने पंतला बाद करून संघासाठी मोठे यश मिळविले. पंतने 27 धावा केल्या आणि शुभमन गिलकडे झेलबाद झाला. यानंतर चक्रवर्तीने पुढील चेंडूवर अर्धशतकाच्या जवळ पोहचलेल्या श्रेयस माघारी धाडलं. यानंतर दिल्लीच्या विकेट पडण्याचे सत्र सुरूच राहिले. मार्कस स्टोइनिस 6 आणि अक्षर पटेल 9 धावा करून बाद झाले. दिल्लीसाठी कगिसो रबाडाने 9 धावा केल्या. तुषार देशपांडे आणि आर अश्विन नाबाद धावा करून परतले.

यापूर्वी, केकेआरने सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर जोरदार कमबॅक केलं आणि नितीश राणा व सुनील नारायण यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 194 धावांपर्यंत मजल मारली. नितीशने 53  चेंडूत 81 धावा केल्या, तर नारायण 32 चेंडूत 64 धावा करुन आऊट झाला. दिल्लीसाठी रबाडा, एनरिच नॉर्टजे आणि स्टॉयनिसला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.