टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) उद्यापासून नागपूरमध्ये आमनेसामने येणार आहेत. हा सामना बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील (Border-Gavaskar Trophy) पहिला सामना असेल. सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे जेतेपद पटकावण्याकडे टीम इंडियाची (Team India) नजर असेल. त्याचबरोबर मागील सलग तीन पराभवांचा बदला पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरणार आहे. सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीवर (Virat Kohli) असणार आहेत. अलीकडेच, टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केले. बांगलादेशपाठोपाठ एकदिवसीय क्रिकेटमध्ये किंग कोहलीने श्रीलंकेविरुद्ध दोन शतके झळकावून धूम ठोकली. आता कसोटी क्रिकेटमध्ये त्याची जादू पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
विराट कोहलीने अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात केवळ ४५ धावा केल्या होत्या. आता किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. तसे पाहता, ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध विराटचा विक्रम मोठा आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या 20 कसोटी सामन्यांमध्ये 1682 धावा केल्या आहेत, ज्यात 7 शतकांचा समावेश आहे. आगामी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून नागपुरात होणार आहे. या मैदानावर विराट कोहलीचाही मोठा विक्रम आहे. (हे देखील वाचा: Steve Smith On Ravichandran Ashwin: अश्विनविरुद्ध आमचा संघ तयारीनिशी उतरणार मैदानात, सामन्यापूर्वी स्टीव्ह स्मिथने केला मोठा दावा)
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने नागपुरात 3 कसोटी सामने खेळले असून त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या मैदानावर विराट कोहलीने चार डावांत 354 धावा केल्या आहेत ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. या मैदानावर विराट कोहलीच्या बॅटमधून द्विशतकही झळकले आहे आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या २१३ आहे जी त्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध केली होती. या मैदानावर विराट कोहलीने 88.50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
टीम इंडियाचा संघ (पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी)
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, (पहिल्या कसोटीतून बाहेर) केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.