Legends League Cricket: केविन पीटरसनने एका 1 षटकात चोपल्या 30 धावा, भारतीय क्रिकेटपटूने पुन्हा IPL मध्ये खेळण्याची ऑफर दिली; पहा माजी दिग्गजची रिअक्शन
केविन पीटरसन (Photo Credit: Twitter)

इंग्लंडचा माजी स्टार फलंदाज केविन पीटरसनने (Kevin Pietersen) यूएईमध्ये सुरु असलेल्या लिजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेत आशिया लायन्सविरुद्ध तुफानी खेळी केली. वर्ल्ड जायंट्स (World Giants) संघाकडून खेळताना सामन्यात त्याने एकाच षटकात 30 धावा लुटल्या. त्याच्या या धमाकेदार खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 38 चेंडूत 86 धावांची दमदार खेळी करताना पीटरसनने पुन्हा एकदा जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. पीटरसनचा हा दमदार खेळ पाहून भारतीय क्रिकपटू श्रीवत्स गोस्वामीने  (Srivats Goswami) इंग्लंडच्या माजी फलंदाजाला निवृत्तीतून पुनरागमन करून आयपीएलमध्ये  (IPL) खेळण्याची मोहक ऑफर दिली. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2022 मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पीटरसनने आपल्या शानदार खेळीत नऊ चौकार आणि सात षटकार ठोकले.

पीटरसनने श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि आशिया लायन्सकडून खेळत असलेल्या सनथ जयसूर्याच्या एका षटकात 30 धावा चोपल्या. पीटरसनने जयसूर्याच्या षटकात 3 चौकार आणि 3 षटकार मारत एका षटकात 30 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट ली देखील या सामन्यात वर्ल्ड जायंट्स संघाकडून खेळताना दिसला. त्याने आपल्या 4 षटकांमध्ये अनेक वेळा फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. दरम्यान पीटरसनला ऑफर देत गोस्वामीने लिहिले, “आयपीएलमध्ये परत ये मित्रा.” यानंतर गोस्वामीच्या पोस्टला पीटरसनने अप्रतिम उत्तर दिले.

पीटरसनचा जयसूर्यावर हल्लाबोल

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन म्हणाला की, “मी खूप महाग ठरेन आणि कदाचित लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल. हे सर्व आधुनिक खेळाडूंना लाजवेल!”

उल्लेखनीय आहे की पीटरसन आपल्या सक्रिय क्रिकेट कारकिर्दीत आयपीएल स्पर्धे खेळला आहे. इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज रायझिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स (कॅपिटल्स) कडून यापूर्वी खेळला आहे. त्याने आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तर 2018 मध्ये इंग्लंडच्या क्रिकेटपटूने सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली.