Ravindra Jadeja (Photo Credit - X)

Ranji Trophy 2025: रणजी ट्रॉफी 2025 मध्ये आज दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यातील सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा देखील खेळताना दिसत आहेत. दिल्लीचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत पहिल्या डावात अपयशी ठरला, तर सौराष्ट्रचा अष्टपैलू रवींद्र जडेजा चमकदार कामगिरी करताना दिसला. पहिल्या डावात 5 बळी घेत जडेजाने दिल्लीच्या फलंदाजीचा कणा मोडला. सौराष्ट्रच्या शानदार गोलंदाजीसमोर संपूर्ण दिल्ली संघ पहिल्या डावात फक्त 188 धावांवर गारद झाला. दिल्लीकडून फलंदाजी करताना कर्णधार आयुष बदोनीने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. याशिवाय यश धुलने 44 आणि मयंकने नाबाद 38 धावा केल्या.

जडेजाने 5 विकेट्स घेतल्या

सौराष्ट्रकडून रवींद्र जडेजाने अप्रतिम गोलंदाजी केली. गोलंदाजी करताना जडेजाने 17.4 षटकांत 66 धावा देत 5 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. ज्यामुळे दिल्ली संघ 200 धावांचा टप्पाही गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा व्यतिरिक्त, धर्मेंद्र जडेजानेही उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि 19 षटकांत 63 धावा देत 3 बळी घेतले. (हे देखील वाचा: Who is Umar Nazir Mir: कोण आहे उमर नझीर मीर? रणजीमध्ये रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेला स्वस्तात केले बाद)

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी चांगले संकेत

यापूर्वी, रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला होता. या मालिकेत जडेजाने फलंदाजीत चांगली कामगिरी केली असली तरी गोलंदाजीत तो काही खास कामगिरी करू शकला नाही. आता जडेजाची 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. अशा परिस्थितीत, जडेजाचे फॉर्ममध्ये पुनरागमन टीम इंडियासाठी चांगले संकेत देत आहे.