IPL 2020 Update: 'हे इंडियन प्रीमियर लीग आहे, चिनी प्रीमियर लीग नाही'; BCCI ने हळूहळू चिनी प्रायोजकांशी संबंध तोडावे, KXIP सहमालक नेस वाडीयाचे मत
KXIP सहमालक नेस वाडीया (Photo Credit: Getty)

भारत (India)-चिनी (China) सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात (Galwan Valley) नुकत्याच झालेल्या चकमकीनंतर चीनविरोधात देशभरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बीसीसीआयनेही (BCCI) जनभावनेचा आदर करत, चिनी कंपन्यांसोबतच्या कराराबद्दल पुनर्विचार करण्याची तयारी दाखवली. चिनी मोबाईल कंपनी VIVO आणि बीसीसीआय यांच्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) प्रायोजकत्वासाठी 2022 पर्यंत करार झाला आहे. प्रत्येक हंगामासाठी VIVO कंपनी बीसीसीायला 400 कोटींपेक्षा जास्त निधी देते. भारत सरकारने देशात 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणल्याची घोषणा करताच किंग्ज इलेव्हन पंजाबचे (Kings XI Punjab) सह-मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांनीही बीसीसीआयला हळूहळू आयपीएलमधील चिनी प्रायोजकांशी संबंध तोडण्याचे आवाहन केले. 2020 मध्ये नसल्यास भारतीय बोर्डाने 2021 पर्यंत संबंध तोडले पाहिजेत, असे मत वाडिया यांनी मांडले. गॅलवान खोऱ्यात नुकत्याच झालेल्या घटनेमुळे बीसीसीआयने चीनी प्रायोजकतेचा आढावा घेण्यासाठी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक बोलाविण्यास उद्युक्त केले पण अद्याप ती बैठक झाली नाही. (India-China Clash: भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचा चीनमध्ये बनविलेल्या उपकरणांच्या वापरावर बहिष्काराचा निर्णय, SAI ला दिली माहिती)

“देशाच्या हितासाठी आपण आयपीएलमधील चिनी प्रायोजकांशी संबंध तोडले पाहिजे. देश पहिले, पैसे नंतर. आणि ही इंडियन प्रीमियर लीग आहे, चिनी प्रीमियर लीग नाही. त्यासाठी आपण उदाहरण समोर ठेवले पाहिजे,"वाडिया यांनी PTI ला सांगितले. “हो सुरवातीला प्रायोजक शोधणे कठीण होईल पण मला खात्री आहे की त्यांच्या जागी पुरेसे भारतीय प्रायोजक आहेत. देशाबद्दल आणि आपल्या सरकारबद्दल आणि विशेष म्हणजे आपल्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या सैनिकांबद्दल आपण आदर ठेवायला हवा," प्रख्यात भारतीय व्यावसायिकाने म्हटले.

आयपीएल संघांमधील चिनी प्रायोजकत्वाबाबत विचारले असता वाडिया म्हणाले, "संघांनादेखील चिनी प्रायोजकांच्या बदलीसाठी वेळ दिला पाहिजे. मी म्हटल्या प्रमाणे त्यांच्या जागी पुरेशी भारतीय कंपन्या आहेत." दरम्यान, Vivo कंपनी व्यतिरीक्त आयपीएलमध्ये Paytm, Swiggy, Dream 11 या चिनी कंपन्यांची गुंतवणूक आहे. नुकतच केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चिनी App बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातला हा संघर्ष किती दिवस सुरु राहतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.