IND vs WI 1st T20: इशान किशन की ऋषभ पंत? रोहित शर्मासोबत सामन्याची सलामी सुरुवात कोण करणार?
Ishan Kishan And Rishabh Pant (Photo Credit - Twitter)

ऋषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंडविरुद्धच्या (ENG) T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) डावाची सुरुवात केली. केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी संघाचा भाग नव्हता. आता तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही टीम इंडियात सहभागी होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी संघ व्यवस्थापनासमोर दोनच पर्याय उरले आहेत. ईशान किशन किंवा ऋषभ पंत. इशान किशन हा धडाकेबाज फलंदाज आहे आणि तो मुंबई इंडियन्समध्येही रोहित शर्मासोबत बराच काळ खेळत आहे. रोहित आणि त्याच्यातील संबंधही चांगले आहेत. याशिवाय इशान हा डावखुरा फलंदाज आहे, तर रोहित उजव्या हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे डावी आणि उजवीची जोडीही कायम राहील.

ईशानने भारतासाठी आतापर्यंत 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 16 सामन्यात सलामीवीर म्हणून खेळला आहे. ईशानने या 16 सामन्यांमध्ये 31.75 च्या सरासरीने आणि 134.39 च्या स्ट्राईक रेटने एकूण 508 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत इशानला डावाची सलामी देण्यासाठी सध्याच्या घडीला सर्वोत्तम पर्याय वाटतो. (हे देखील वाचा: IND vs WI 1st T20: रोहित शर्माने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर, गेल्या T20 विश्वचषकातील खराब कामगिरीवर दिले स्पष्टीकरण)

पंतसोबत डावाची सलामी देणं टीम इंडियासाठी का महत्त्वाचं?

पंतबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत फक्त दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डावाची सुरुवात केली आहे आणि दोन्ही वेळा तो अपयशी ठरला आहे. पंतने दोन सामन्यांत केवळ 27 धावा केल्या आहेत आणि संघाला वेगवान सुरुवात करण्यातही तो अपयशी ठरला आहे. त्याचबरोबर स्वतः कर्णधार रोहितचा फलंदाजीचा फॉर्म फारसा चांगला जात नाही, अशा परिस्थितीत त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही तर त्याच्यावरील दबावही वाढू शकतो. यंदाचा टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे आणि टीम इंडियाकडे प्रयोगासाठी जास्त वेळ नाही.