राहुल त्रिपाठी (Photo Credit: PTI)

IPL 2022, SRH vs KKR Match 25: सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad)  कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनंतर राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दणदणीत विजय मिळवला. केकेआर संघाने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचे 7 गडी राखून 17.3 षटकांत हंगामातील सलग तिसरा विजय खिशात घातला. राहुल आणि मार्करम बॅटने संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. राहुलने 71 धावा चोपल्या तर मार्करम 68 धावा करून नाबाद परतला. केन विल्यमसनच्या हैदराबादचा पाच सामन्यातील तिसरा विजय ठरला तर श्रेयस अय्यरच्या कोलकाता संघाला सहापैकी तिसरा पराभवाचा सामना करावा लागला आहे. (IPL 2022, SRH vs KKR Match 25: हैदराबादविरुद्ध अजिंक्य रहाणे याला डच्चू; Aaron Finch याने कोलकात्याकडून पदार्पण करत IPL मध्ये घडवला इतिहास)

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादची बॅटने सुरुवात खराब झाली. गेल्या काही सामन्यात हैदराबादच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारा अभिषेक शर्माच्या (31) रूपाने पहिली विकेट पडली. त्यानंतर कर्णधार विल्यमसनने त्रिपाठीच्या साथीने संघाचा डाव स्थिरावला, पण अधिक काळ विल्यमसन खेळपट्टीवर तग धरून खेळू शकला नाही आणि रसेलने 16 चेंडूत 17 धावांत त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर मार्करम आणि त्रिपाठीच्या जोडीने कोलकाता गोलंदाजांनी दाणादाण उडवली व संघाला विजयाच्या जवळ नेले. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. पण मोक्याच्या क्षणी त्रिपाठी 37 चेंडूत 71 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्रिपाठी बाद झाल्यावर मार्करमने पूरनसोबत संघाला विजयीरेष ओलांडून दिली.

तत्पूर्वी हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता संघाची सुरुवात देखील खराब झाली. आरोन फिंच 7 धावा करून बाद झाला. वेंकटेश अय्यर आणि सुनील नारायण देखील बॅटने फारसा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. कर्णधार श्रेयस अय्यरने 28 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तर नितीश राणाने 36 चेंडूत 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय रसेलने 25 चेंडूत नाबाद 49 धावांची खेळी केली. दुसरीकडे, हैदराबादकडून नटराजनने तीन तर उमरान मलिकने दोन गडी बाद केले.