IPL 2022, RR vs GT: गुजरातचा 37 धावांनी दिमाखदार विजय; 193 धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थानची दमछाक, Jos Buttler चे अर्धशतक  निष्फळ
गुजरात टायटन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs GT Highlights: आयपीएल (IPL) 2022 च्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. आज झालेल्या 24  व्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्या रंगतदार लढत पाहायला मिळाली.  या सामन्यात सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी करत 193 धावांचे आव्हान उभे केलेल्या गुजरात संघाने 37 धावांनी दिमाखदार विजय मिळवला. राजस्थान संघ सर्व बाद 155 धावा करु शकला. गुजरातने प्रथम फलंदाजी करून दिलेल्या विशाल धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. जोस बटलर (Jos Buttler) आणि शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) यांना वगळता अन्य खेळाडू बॅटने लढा देण्यात अपयशी ठरले. बटलरने आपला झंझावाती फॉर्म कायम ठेवला आणि सर्वाधिक 54 धावा केल्या. तर हेटमायरने 29 धावांची खेळी केली. गुजरातच्या विजयात यश दयाल आणि लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) यांनी महत्वाची भूमिका बजावली. फर्ग्युसनने तीन तर दयालने दोन विकेट घेतल्या. या विजयासह गुजरातने पॉईंट टेबलमध्ये राजस्थानला खाली ढकलून नंबर 1 चे सिंहासन काबीज केले. (IPL 2022 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सवर मात करून गुजरात No 1, तर ‘हा’ संघ तळाशी, पाहा पॉईंट्स टेबलची स्थिती)

राजस्थानकडून जोस बटलर आणि दवडत पडिक्क्ल ही जोडी पुन्हा एकदा सलामीला उतरली. बटलरने नियमितपणे आक्रमक सुरुवात केली, तर देवदत्त डावाच्या पहिल्याच बॉलवर गुजरातचा नवोदित यश दयालला बळी ठरला. यानंतर क्रमवारीत बढती मिळाल्या आर अश्विनने बटलरसोबत जोडी बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो देखील अधिक काळ खेळपट्टीवर तग धरून खेळण्यात अपयशी ठरली. फर्ग्युसनने आपल्या पहिल्याच षटकांत पहिले अश्विन आणि अखेरच्या बॉलवर बटलरला बाद करून राजस्थानला बॅकफूटवर ढकलले. कर्णधार संजू सॅमसन रनआऊट होऊन 11 धावांवर परतला. यश दयालने तिसर्‍याच षटकात डुसेनला झेलबाद केले. रियान परागने 18 आणि जिमी नीशमने 17 धावा केल्या. नियमित अंतराने विकेट गमावण्याची फटका राजस्थान संघाला बसला.

तत्पूर्वी रॉयल्सचा कर्णधार सजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गुजरातला पहिले फलंदाजीला बोलावले. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. त्यांनी केवळ 53 धावसंख्येवर चार विकेट गमावल्या. पण कर्णधार हार्दिकने जोरदार फटकेबाजी केली आणि राजस्थान गोलंदाजांचा समाचार घेत 87 धावा चोपल्या. हार्दिकने पहिले अभिनव मनोहर सोबत अर्धशतकी भागीदारी करून गुजरातचा डाव सावरला, तर मोक्याच्या क्षणी डेविड मिलरला साथीला घेत धावांचा डोंगर उभारला. अभिनवने 43 धावांची खेळी केली तर मिलर 31 धावा करून नाबाद राहिला.