IPL 2022 RCB vs SRH: गोलंदाजांनी धुवून काढल्यानंतर अभिषेक शर्मा (Abishek Sharma) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) या सलामी जोडीने सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 8 षटकांत 9 विकेट्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला पराभवाचा दणका दिला. आरसीबीचा (RCB) संघ प्रथम फलंदाजी करून अवघ्या 68 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात अभिषेक आणि विल्यमसनच्या जोडीने संघाला मोठा विजय मिळवून दिला. यासह हैदराबादने स्पर्धेत आपला विजयरथ सुरु ठेवून सलग पाचव्या विजयाची नोंद केली. अभिषेक सर्वाधिक 47 धावा केल्या. विल्यमसन 16 धावा आणि राहुल त्रिपाठी 7 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांनी देखील लोटांगण घातले. आरसीबी संघाचा हा आठ सामन्यातील तिसरा पराभव ठरला आहे. तर सनरायझर्सने खेळलेल्या 7 पैकी पाचवा सामना खिशात घातला आहे. (Virat Kohli IPL 2022: विराट कोहली याची बॅट सलग दुसऱ्यांदा शांत, सलग सामन्यात ‘गोल्डन डक’ने झाला स्तब्ध; पाहा व्हिडिओ)
सामन्याबद्दल बोलायचे तर आरसीबीचा फलंदाजी क्रम अक्षरशः पत्त्यांसारखा विखुरला. प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरचा संघ 16.1 षटकांत 10 गडी गमावून 68 धावांत गुंडाळला. आयपीएलमधील संघाची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी 2017 मध्ये संघ कोलकाता विरुद्ध फक्त 49 धावांत गारद झाला होता, जी आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची एका संघाची सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्या षटकातच संघाने आपले तीन विकेट गमावले. अनुज रावत आणि विराट कोहली खाते न उघडताच पॅव्हिलियनमध्ये परतले. उल्लेखनीय म्हणजे मार्को जेन्सनने एकाच षटकात या तिन्ही विकेट घेतल्या. ग्लेन मॅक्सवेल 11 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. तर प्रभुदेसाई 15, शाहबाज 7 धावा करून माघारी परतले. गेल्या अनेक सामन्यात संघाचा ‘संकटमोजन’ ठरलेला दिनेश कार्तिक खाते न उघडता 3 चेंडू खेळून बाद परतला आणि हर्षल पटेलने 4 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून मार्को आणि नटराजन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
आयपीएलमधील कोणत्याही संघाचा चेंडूंच्या बाबतीत हा चौथा सर्वात मोठा विजय आहे. हैदराबादने सातपैकी सलग पाच सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे, तर आरसीबीचे हैदराबादसारखे 10 गुण आहेत, परंतु आठ सामन्यांत त्यांचे 10 गुण आहेत आणि ते आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरले आहेत. याशिवाय आजच्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून गुजरात टायटन्सने अव्वल क्रमांक काबीज केला तर कोलकाताचा पॉईंट टेबलमधील सातवा क्रमांक कायम आहे.