IPL 2022 Opening Ceremony: सलग चौथ्या वर्षी आयपीएलचा उद्घाटन सोहळा नाहीच, सामन्यापूर्वी BCCI ‘या’ खेळाडूंचा करणार सन्मान
वानखेडे स्टेडियम (Photo credits: Wikimedia Commons)

IPL 2022 ची सुरुवात आज, शनिवारी संध्याकाळी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या सामन्याने होईल. या वर्षी आयपीएलचा उद्घाटन सोहळा (IPL Opening Ceremony) होणार नाही आणि थेट सामने खेळण्यास सुरुवात होईल. आयपीएलचा (IPL) उद्घाटन सोहळा आयोजित न करण्याची ही सलग चौथी वेळ आहे. 2018 मध्ये आयपीएलमधील शेवटचा उद्घाटन सोहळा पार पडला होता. पण त्यानंतर 2019 पासून एकही उद्घाटन सोहळा झालेला नाही. बीसीसीआय (BCCI) उद्घाटन समारंभाच्या ऐवजी सामन्यापूर्वी टोकियो ऑलिम्पियन्सचा (Tokyo Olympians) सन्मान करणार आहे. बीसीसीआय (BCCI) काही खेळाडूंचा गौरव करणार आहे ज्यांनी गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक खेळात देशासाठी पदके मिळवली आहेत. (How to Watch CSK vs KKR, IPL 2022 Live in India: सलामीच्या लढतीत चेन्नई-कोलकाता आमनेसामने, कुठे व कसे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग आणि लाइव्ह टेलिकास्ट?)

बीसीसीआयने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक खेळात पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना बक्षीस रक्कम जाहीर केली होती, परंतु आतापर्यंत त्यांचा गौरव केलेला नाही. त्यामुळे आता आयपीएल 2022 सुरुवातीच्या सामन्यापूर्वी BCCI ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान करेल आणि त्यांना बक्षिसाची रक्कम सुपूर्द करेल. Insidesports ने दिलेल्या वृत्तानुसार कोलकाता आणि चेन्नई यांच्यातील सामन्यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करेल. यादरम्यान सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला एक कोटी रुपये देऊन गौरवण्यात येईल. तसेच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नीरजसह बजरंग पुनिया, रवी दहिया, लवलिना यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान पुरुष आणि महिला हॉकी संघातील बहुसंख्य सदस्य देखील सहभागी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय ऑलिम्पिक दलाने विक्रमी सहा पदके जिंकली होती.

दरम्यान, फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल उद्घाटन सोहळा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला होता. पुलवामा हल्ल्यात 40 शहीद जवानांच्या सन्मानार्थ आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर 2020 आणि 2021 मध्ये कोरोनामुळे उद्घाटन सोहळा होऊ शकला नाही. आणि आता उद्घाटन सोहळा 2022 मध्येही होणार नाही. सुरुवातीपासूनच, आयपीएलच्या चित्तथरारक उद्घाटन सोहळा लक्षवेधक होते. आयपीएल उद्घाटन कार्यक्रमांनी बॉलीवूडचे आघाडीचे स्टार्स आणि संगीत दिग्गजांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. परंतु, 2019 पासून कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय आयपीएल स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.