ड्वेन ब्रावो (Photo Credit: Twitter/IPL)

CSK vs KKR, IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या हंगामात लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) सर्वकालीन गोलंदाजीचा विक्रम मोडण्याचा इरादा घेऊन चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) दमदार अष्टपैलू ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) आज कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरेल. प्रसिद्ध टी-20 लीगमध्ये मलिंगाच्या 170 विकेट्सच्या विक्रमापासून ब्रावो फक्त 3 बळी मागे आहे. सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर मलिंगा राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) फ्रँचायझीचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आयपीएलमध्ये पुनरागमन करत असताना, 38 वर्षीय ब्रावोने चेन्नई सुपर किंग्जसोबत 4 कोटी रुपयांचा करार केला आहे. ब्रावो सध्या 167 विकेट्ससह आयपीएलमध्ये सर्वाधिक गडी (Most IPL Wickets) बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. (IPL मध्ये ‘या’ दोनच खेळाडूंच्या नेतृत्वात MS Dhoni खेळला आहे, तुम्हाला माहीत आहे का?)

याशिवाय ब्रावोने सर्व टी-20 क्रिकेटमध्ये 522 सामन्यांमध्ये 571 विकेट्स घेऊन सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम आधीच आपल्या नावावर केला आहे. या बाबतीत ब्रावोच्या जवळ जो इमरान ताहिर आहे, पण तो ब्रावोच्या विक्रमी विकेटच्या आकड्यापासून 120 बळी दूर आहे. दुसरीकडे, ब्रावो वगळता अमित मिश्रा आणि पियुष चावला सारख्या भारतीय फिरकीपटूंना देखील मलिंगाच्या पुढे जाण्याची संधी होती, परंतु त्यांना आयपीएल 2021 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी पुरेसे सामने मिळाले नाहीत. मिश्राने आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी 4 सामने खेळले आणि 6 विकेट्स घेऊन आपली संख्या 166 वर नेली. आयपीएल 2022 च्या लिलावात मिश्राला एकही खरेदीदार सापडला नाही. याशिवाय मुंबई इंडियन्सने 2  कोटी रुपयात खरेदी केलेला चावला गेल्या वर्षी फक्त एकच सामना खेळला आणि या वर्षी त्याला मेगा लिलावात एकही फ्रँचायझीने खरेदी करण्यात रस दाखवला नाही. चावलाच्या खात्यात 157 विकेट आहेत.

टॉप-5 मध्ये भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंह आहे ज्याने 150 विकेट्सघेतल्या आहेत. गेल्या वर्षी KKR चे प्रतिनिधित्व केलेल्या विश्वचषक विजेत्याने या वर्षाच्या सुरुवातीला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, दीपक चाहर याच्या काही सामन्यातील अनुपस्थितीमुळे चेन्नई सुपर किंग्जसाठी ब्रावोची भूमिका महत्त्वाची ठरेल. ब्रावोने गेल्या वर्षी 11 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या, आणि माजी कर्णधार एमएस धोनीकडून त्याच्या डेथ-गोलंदाजीच्या प्रयत्नांसाठी कौतुक मिळवले.