IPL 2022, MI vs RR: आला रे! रोहित शर्माच्या वाढदिवशी ‘पलटन’ने पराभवाचा घेतला बदला, राजस्थानवर 5 गड्यांनी मात करत मुंबईने पहिल्या विजयाचा फोडला नारळ
तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs RR Match44: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अखेर आपल्या पराभवाची मालिका खंडित केली आणि राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 5 विकेट्सने मात करून आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामात पहिल्या विजयाचा नारळ फोडला. नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) अर्धशतक, तिलक वर्माच्या 35 आणि टिम डेविडच्या (Tim David) छोटेखानी खेळीने मुंबईच्या झोळीत पहिला विजय पाडला. यासह मुंबईने कर्णधार रोहितला वाढदिवसाची (Rohit Sharm Birthday) विजयी भेट दिली. तसेच मुंबईने राजस्थानच्या सलग तीन विजयाच्या मालिकेवर ब्रेक लावला. सूर्यकुमारने सर्वाधिक 51 धावा केल्या. दुसरीकडे, राजस्थानसाठी ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन, आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. (IPL 2022: राजस्थानविरुद्ध Rohit Sharma याच्या विकेटवर जसप्रीत बुमराहची पत्नी Sanjana Ganesan हिची रिअक्शन व्हायरल, पहा व्हिडिओ)

राजस्थानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने पॉवरप्लेमध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशन, या दोन्ही सलामी फलंदाजांची विकेट गमावली. रोहित दोन तर किशन 26 धावा करून बाद झाले. यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्माच्या जोडीने मोर्चा सांभाळला. दोघांमधील तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांच्या भागीदारीने मुंबईच्या पहिल्या विजयाचा पाया रचला. यादरम्यान सूर्याने लय मिळवून स्पर्धेत आणखी एक अर्धशतक ठोकले. दोन्ही खेळाडूंमधील भागीदारी राजस्थानसाठी डोकेदुखी ठरत असताना चहलने सूर्याला रियान परागकरवी झेलबाद केले. यादवच्या पाठोपाठ प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर मोठ्या फटका खेळण्याच्या नादात तिलक देखील झेलबाद झाला. मात्र, पोलार्ड आणि डेविडच्या भागीदारीने रॉयल्सच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. डेविड 20 धावा करून नाबाद राहिला. यासह मुंबईने अखेरीस आपले विजयाचे खाते उघडले आणि पहिल्या पराभवाचा बदला घेत राजस्थानला तिसऱ्या पराभवाची चव चाखवली.

यापूर्वी देवदत्त पडिक्कल 15 आणि संजू सॅमसन 16 धावा करून झटपट बाद झाले. यानंतर बटलरने डेरील मिशेलसोबत डाव सांभाळला पण दोन्ही फलंदाज धावा काढण्यासाठी झगडताना दिसले. बटलरने 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण हृतिक शोकीनच्या षटकात सलग चार षटकार मारून आपला स्ट्राईक रेट वाढवला. बटलरने 52 चेंडूत 67 धावा केल्या. शेवटी अश्विनने 9 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकारासह 21 धावांची तुफानी खेळी करत संघाला 150 पार नेले. मुंबईकडून हृतिक आणि रिले मेरेडिथने प्रत्येकी 22 बळी घेतले.