IPL 2022, MI vs RR : मुंबईची हाराकिरी सुरूच, राजस्थानविरुद्धच्या दणदणीत पराभवानंतर निराश रोहित शर्मा पहा काय म्हणाला?
रोहित शर्मा (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा 9वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला गेला, जिथे राजस्थान रॉयल्सने मुंबईचा पराभव करून सामन्यात विजयी झंडा फडकवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करताना रॉयल्सने जोस बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 8 बाद 193 धावांपर्यंत मजल मारली आणि मुंबईसमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात मुंबईला ईशान किशन आणि तिलक वर्माच्या अर्धशतकांच्या जोरावर 8 विकेट्सच्या मोबदल्यात 170 धावाच करता आल्या. राजस्थानविरुद्धच्या दणदणीत पराभवानंतर संघाचा कर्णधार रोहित खूपच निराश दिसला, आणि त्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. (IPL 2022, MI vs RR Match 9: मुंबईच्या ‘पलटन’चा सलग दुसरा पराभव; चहलची फिरकी, बटलरच्या वादळी खेळीमुळे राजस्थानची सामन्यात बाजी)

राजस्थानविरुद्ध पराभवानंतर रोहित म्हणाला, “मला वाटले की त्या खेळपट्टीवर 193 धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो, विशेषत: जेव्हा आम्हाला 7 षटकात 70 धावांची गरज होती. परंतु या गोष्टी घडू शकतात आणि हे सुरुवातीचे दिवस. आम्ही त्यातून शिकू शकतो.” तसेच या सामन्यात शतक झळकावणाऱ्या बटलरचे त्याने कौतुक केले. रोहित शर्मा म्हणाला, “राजस्थानकडून बटलरने चांगली फलंदाजी केली. त्याला आऊट करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले.” मुंबई संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजयाचे वातावरण निश्चितच निर्माण केले होते, पण तो मुंबईला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. या सामन्यात पोलार्ड 24 चेंडूत 1 षटकार आणि तीन चौकारांसह 22 धावा करून बाद झाला.

यापूर्वी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ईशान किशन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतके झळकावली. किशनने 43 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 54 धावांची खेळी केली. तर युवा फलंदाज तिलक वर्मा याने आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आणि 33 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या खेळी 61 धावा ठोकल्या. मात्र, दोघांची ही खेळी मोठी होऊ शकली असती पण अश्विनने किशनला माघारी धाडलं. या दोघांशिवाय रोहित शर्मा 10 धावा, अनमोलप्रीत सिंग 5 धावा, टिम डेविड 1 आणि मुरुगुन अश्विन 6 धावा करून बाद झाले.