IPL 2022, LSG vs DC: आयपीएलच्या (IPL) 15 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) गोलंदाजांच्या कमाल कामगिरीनंतर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात दिल्लीने पहिले फलंदाजी करून लखनऊसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात LSG ने 4 विकेट गमावून 19.4 षटकांत लक्ष्य गाठले. लखनऊच्या विजयात डी कॉकने 52 चेंडूत 80 धावांची सर्वाधिक खेळी केली. दिल्लीवरील या विजयाने लखनऊ संघाला गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. तसेच कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) 29 धावा केल्या आणि कृणाल पांड्या धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे दिल्लीचा तीन सामन्यातील हा दुसरा पराभव ठरला आहे. तर लखनऊचा हा चारपैकी तिसरा विजय आहे. (Krunal Pandya याच्यासोबतच्या वादाला Deepak Hooda ने लावला ‘पूर्णविराम’, वर्षभराच्या भांडणानंतर आपल्या नात्यावर पाहा काय म्हणाला)
पृथ्वी शॉच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनऊसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. शॉने 34 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावांची तुफानी खेळी केली. प्रत्युत्तरात राहुल आणि डी कॉकच्या सलामी जोडीने दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 73 धावांच्या भागीदारीने दिल्लीच्या गोलंदाजांना विकेटसाठी जोरदार संघर्ष करायला भाग पाडले. पण पॉवरप्लेनंतर कर्णधार राहुलच्या रूपात संघाने पहिली विकेट गमावली. कुलदीप यादवच्या चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात राहुल 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर एविन लुईस देखील फारसे योगदान देऊ शकला नाही आणि ललित यादवच्या बॉलवर खराब फटका खेळून पाच धावांवर तंबूत परतला. लखनऊ सुपर जायंट्ससाठी डी कॉकने 80 धावांची शानदार खेळी खेळली. तर आयुष बडोनी याने शेवटी एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाला विजयीरेष ओलांडून दिली. दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर ललित यादव आणि शार्दूल ठाकूर यांना प्रत्येकी 1-1 यश मिळाले.
तत्पूर्वी, सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर लखनऊने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी आपल्या वर्चस्वपूर्ण कामगिरीने तो योग्य ठरवला. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांची कामगिरी काही विशेष होऊ शकली नाही आणि निर्धारित 20 षटके खेळून संघ 3 गडी गमावून 149 धावांच करू शकला. दिल्लीकडून पृथ्वी शॉने 34 चेंडूत 61 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. दुसरीकडे कर्णधार ऋषभ पंत 39 आणि सर्फराज खानने 36 धावा करून नाबाद परतले. लखनौमधून रवी बिश्नोईने 2 आणि के. गौतमने एक विकेट घेतली.