IPL 2022, KKR vs SRH Match 61: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने केन विल्यमसनच्या सनरायझर्स हैदराबादचा (Sunrises Hyderabad) धुव्वा उडवला आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या (IPL PlayOffs) शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले. केकेआरने (KKR) प्रथम फलंदाजी करून 177 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात हैदराबाद 20 षटकांत 123/8 धावाच करू शकले. परिणामी कोलकात्याच्या 54 धावांनी दमदार विजय मिळवला आणि प्लेऑफच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली. केकेआरच्या विजयात आंद्रे रसेलने (Andre Russell) निर्णायक भूमिका वाजवली. रसेलने फलंदाजी करत नाबाद 49 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर गोलंदाजीत त्याने दोन विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, सनरायझर्ससाठी अभिषेक शर्माने 43 आणि एडन मार्करमने 32 धावा केल्या. पण फलंदाजांच्या फ्लॉप कामगिरी संघाला पराभवाच्या रूपात नडली. यासह SRH आता प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडले आहे. (IPL 2022 Points Table Updated: कोलकाताचे Playoffs मधील आव्हान कायम तर सलग पाचवा सामना गमावून SRH ची पॉईंट टेबलमध्ये मोठी घसरण)
नाईट रायडर्सकडून मिळालेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विल्यमसन आणि अभिषेक यांच्यात 30 धावांची भागीदारी झाली. विल्यमसनच्या रूपात पहिली विकेट पडल्यावर हैदराबादची फलंदाजी गडगडली. राहुल त्रिपाठी पुन्हा एकदा बॅटने योगदान देण्यात अपयशी ठरला. मार्करमच्या साथीने हैदराबादचा डाव स्थिरावण्याच्या प्रयत्नात अभिषेक देखील चुकीचा फटका खेळून बाद झाला. सनरायझर्ससाठी सलग अर्धशतके करणाऱ्या निकोलस पूरनकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या, पण सुनील नारायणने त्याला अवघ्या दोन धावांवर पॅव्हिलियनची वाट दाखवली. त्यानंतर मार्करमने काही मोठे फटके खेळून संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या, पण उमेश यादवने त्याचा त्रिफळा उडवला आणि संघाला विजयच्या जवळ नेले. केकेआरसाठी रसेल वगळता टिम साउदीने 2 विकेट्स घेतल्या. तर उमेश यादव, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.
यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स 6 बाद 177 धावा केल्या. हैदराबादचे गोलंदाज एकावेळी सामन्यावर वर्चस्व गाजवत असताना रसेलने अंतिम षटकांत जोरदार फटकेबाजी करून संघासाठी मोठी धावसंख्या उभारली. आंद्रे रसेलने नाबाद 49 आणि सॅम बिलिंग्सने 43 धावा केल्या. तर सनरायझर्सकडून उमरान मलिकने 33 धावांत तीन बळी घेतले.