IPL 2022: उदयोन्मुख भारतीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2022 मध्ये आपल्या कच्च्या वेगानं कहर केला आहे. जागतिक क्रिकेटमधील काही उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांशी स्पर्धा करत मलिकने चालू आवृत्तीत नियमितपणे 150 किमी प्रतितास गोलंदाजी केली आहे आणि छाप पाडली आहेत. क्रिकेट तज्ज्ञ आणि जाणकार त्याच्या वेगवान गोलंदाजीने चांगलेच प्रभावित झाले आहेत व त्याला पहिल्यांदा टीम इंडियात संधी मिळण्याचे ही म्हटले जात आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमल देखील मलिकच्या आयपीएल 2022 मधील कामगिरीने प्रभावित झाला आहे आणि तो म्हणाला की मलिक पाकिस्तानमध्ये असता तर तो आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असता. (IPL 2022, SRH vs CSK: वेगाचा ‘मालिका’ Umran Malik, सनरायझर्स हैदराबाद हूकच्या एक्क्याने टाकला सर्वात वेगवान चेंडू, जाणून घ्या किती स्पीड)
PakTV.com शी केलेल्या संभाषणात अकमलने म्हटले की, जर तो (उमरान मलिक) पाकिस्तानात असता तर कदाचित तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असता. त्याचा इकॉनॉमी रेट जास्त आहे पण तो स्ट्राइक बॉलर आहे कारण त्याला विकेट मिळत आहेत. अकमलने सांगितले की उमरान मलिकचा स्पीड चार्ट प्रत्येक सामन्यात वर जात आहे आणि तो 155 किमीच्या जवळपास राहतो जो खाली येत नाही. भारतीय संघात चांगली स्पर्धा आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाजांची कमतरता होती. आता त्यांच्याकडे शमी, सिराज, बुमराह आणि नवदीप सैनीसारखे वेगवान गोलंदाज आहेत. उमेश यादवही शानदार गोलंदाजी करत आहे. अशा परिस्थितीत 10-12 वेगवान गोलंदाजांसह भारतीय निवडकर्त्यांना निवडणे कठीण होत आहे.
इतकंच नाही तर 2008 मध्ये पहिले आयपीएल जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्स (RR) संघाचा भाग असलेल्या अकमलने मलिकची तुलना शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांच्याशी केली व म्हटले की दिग्गज जोडी देखील महाग होती परंतु त्याच वेळी त्यांनी विकेट्सही घेतल्या. मलिकने आतापर्यंत ऑरेंज आर्मीकडून 11 सामने खेळले असून त्यात त्याने 15 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या मोसमात तो फक्त तीन सामने खेळला होता ज्यात त्याने दोन गडी बाद केले होते. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, SRH ने मलिकला 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते.