IPL 2022 Playoffs Qualification: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 15 वा हंगाम अर्ध्यावर येऊन पोहोचला आहे आणि आता सर्वांना उत्सुकता लागून आहे ती आगामी प्लेऑफ सामन्यांची. या वर्षापासून 10 संघात सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक सामना रोमहर्षक ठरला आहे. आयपीएलच्या (IPL) इतिहासात सर्वाधिक वेळा विजेतेपद जिंकणारे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची अत्यंत खराब हालत आहे. तर गेल्या काही हंगामात संघर्ष करणारे जुने संघ आता काट्याची टक्कर देत आहेत. प्रत्येक संघ किमान 7 ते 8 सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत आता प्लेऑफचे चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. आणि या वर्षी टॉप-4 मध्ये नवीन संघ प्रवेश करण्याची शक्यता आहे. (IPL 2022 Points Table Updated: पराभवानंतरही SRH चे स्थान अबाधित, गुजरात टायटन्स पुन्हा No 1 सिंहासनावर विराजमान)
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (Gujarat Titans) प्लेऑफचे तिकीट मिळवण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. गुजरातने सनरायझर्स हैदराबादवर पाच विकेट्सने मात करत चालू मोसमातील सातवा विजय नोंदवला. या विजयासह गुजरात संघाचे 8 सामन्यात 7 विजयासह 14 गुण झाले आहेत.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने या मोसमात आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत ज्यात त्यांनी 6 जिंकले आणि दोन गमावले आहेत. राजस्थान संघ 12 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आणखी दोन विजयाची गरज असून आणखी 6 सामने खेळायचे आहेत. तसेच नेटनेरेटच्या बाबतीत राजस्थान पहिल्या 4 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
गुजरातविरुद्धचा सामना गमावल्यानंतर हैदराबादचा संघ तिसऱ्या क्रमांकावर बसला आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील SRH संघाने 8 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. ऑरेंज आर्मी 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून ते उर्वरित 6 पैकी 3 सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.
लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants)
केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौने आठपैकी पाच सामने जिंकले आहेत आणि एकूण 10 पॉईंटसह संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. सुपर जायंट्सला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असल्याने उर्वरित 6 पैकी किमान 3 सामने जिंकावे लागतील. LSG संघ 14 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचू शकते, परंतु त्यांना इतर संघांच्या निकालांवरही लक्ष ठेवून राहावे लागणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाचे 9 सामने 5 विजयासह 10 गुण आहेत. आरसीबीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्याविरुद्ध सातत्याने पराभवामुळे त्यांच्या प्लेऑफच्या संधींना धक्का बसला आहे. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित पाचपैकी तीन सामने मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. सध्या त्याचा नेट रनरेट (-0.572) नकारात्मक आहे, त्यामुळे आता प्रत्येक पराभव त्यांना प्लेऑफच्या शर्यतीपासून दूर नेईल.
पंजाब किंग्ज (Punjab Kings)
मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाबने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. PBKS संघ मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजयी मार्गावर परतला. या विजयासह पंजाबचे 8 गुण झाले असून ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेटी. आशा परिस्थितीत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच त्यांचाही मार्ग खडतर बनला आहे. पंजाब किंग्जला उर्वरित 6 पैकी चार सामने जिंकावे लागतील तसेच त्यांचा नेट रनरेट (-0.419) सुधारावा लागेल.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
गेल्या वर्षी ‘टेबल टॉपर’ असलेले दिल्ली कॅपिटल्स संघाने या हंगामात आतापर्यंत सातपैकी केवळ 3 सामने जिंकू शकला आहे. दिल्लीचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी ऋषभ पंतच्या संघाला उर्वरित सात सामन्यांपैकी किमान पाच सामने जिंकावे लागतील. दिल्ली 14 गुणांसह पहिल्या 4 मध्ये पोहोचू शकते परंतु त्यांना इतर संघांच्या निकाल आणि नेट रनरेट अवलंबून राहावे लागेल.
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने या मोसमात 8 पैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. केकेआरने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली पण त्यानंतर संघाने सलग 5 सामने गमावले. त्यामुळे आता प्लेऑफमधील आपले स्थान पक्के करण्यासाठी त्याला उर्वरित 6 पैकी आणखी पाच सामने जिंकावे लागतील. चार संघांचे समान 10 गन असल्यास केकेआरचा 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करणे कठीण होईल. त्यामुळे त्यांना उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे.
चेन्नई सुपर किंग्ज
रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील पहिला सीजन खेळणारा चेन्नई संघ आठपैकी केवळ दोन सामने जिंकू शकला आहेत. जडेजा नेतृत्वासह फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही फ्लॉप ठरला आहे. सीएसकेला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. चेन्नई पाच सामने जिंकूनही अंतिम 4 चे तिकीट मिळवू शकते, पण त्यासाठी त्यांना अन्य संघाचा निकाल आणि नेट रनरेटवरही अवलंबून राहावे लागेल.
मुंबई इंडियन्स
आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघाबद्दल काय बोलायचे समजत नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघ पहिल्या विजयाचा भुकेला आहे. मुंबईला सलग 8 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत मुंबईचा संघ या मोसमात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. आता मुंबईने आपले उर्वरित सहा सामने जिंकले तरी त्यांचे 12 गुण होतील आणि ते प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे नाहीत.