IPL 2022, CSK vs PBKS Match 11: इंडियन प्रीमियर लीग मध्ये फलंदाजांची हाराकिरी सुरूच आहे. पंजाब किंग्स संघाने बॅटनंतर बॉलने वर्चस्वपूर्ण कामगिरी करून चेन्नईला सलग तिसऱ्या पराभवाची धूळ चारली. सीएसकेच्या खराब फलंदाजीने घात केला तर पंजाबने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर 54 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. पंजाबचा तीन सामन्यातील हा दुसरा विजय ठरला, तर चेन्नईच्या पराभवाची हॅटट्रिक झाली. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सीएसकेची ही सर्वात निराशाजनक कामगिरी ठरली आहे. चेन्नईचा अष्टपैलू शिवम दुबे याने सर्वाधिक 57 धावा केल्या, तर एमएस धोनी याने 23 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, पंजाबच्या विजयात राहुल चाहरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर वैभव अरोरा आणि लियाम लिविंगस्टोन यांनी 2-2 विकेट घेतल्या. तसेच कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह आणि ओडियन स्मिथ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (Who is Vaibhav Arora: कोण आहे ‘हा’ स्विंग चा सुलतान ज्याने चेन्नईच्या धुरंधर फलंदाजांना लोळवलं, जाणून घ्या त्याच्याबद्दल सर्वकाही)
पंजाब किंग्सने दिलेल्या विशाल धावसंख्याचे पाठलाग करताना चेन्नईच्या आघाडीचा एकही फलंदाज तळ ठोकून आव्हान देण्यात अपयशी ठरला. तीन फलंदाज झटपट बाद झाल्यावर फलंदाजीला उतरलेल्या कर्णधार रवींद्र जडेजाकडून बॅटने संघाला मोठ्या अपेक्षा होता, पण त्याने बॉलनंतर बॅटने देखील निराशा केली. जडेजासह मोईन अली खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतले आणि संघावर मोठ्या पराभवाची नामुष्की ओढवली. तथापि शिवम दुबे आणि धोनी यांनी दमदार फलंदाजी करून संघाच्या पहिल्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. दुबेचे मार्गदर्शन करून धोनी संथ खेळी करत होता. दुबेने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजी करून आपले अर्धशतक ठोकले, पण तो लगेचच खराब शॉट खेळू बाद झाला. यानंतर धोनी संघाला विजयीरेष ओलांडून देण्यात फ्लॉप ठरला.
प्रथम फलंदाजी करताना पंजाबने चेन्नईसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र या धावसंख्येसमोर CSKचा संपूर्ण संघ 126 धावांवर गारद झाला. पंजाबकडून फलंदाजीत दमदार कामगिरी करणाऱ्या लिविंगस्टोनने 60 धावा केल्या आणि दोन बळीही घेतले. लिविंगस्टोनने 32 चेंडूत 60 धावांची तुफानी खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले. यादरम्यान लिविंगस्टोनने 5 चौकार आणि चार षटकार ठोकले. याशिवाय शिखर धवनने 24 चेंडूत 33 धावांची खेळी खेळली. धवन आणि लिविंगस्टोनमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. चेन्नईकडून ख्रिस जॉर्डन आणि प्रिटोरियसने प्रत्येकी 2 बळी घेतले.