पंजाब किंग्स (Photo Credit: Twitter/IPL)

Who is Vaibhav Arora: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि पंजाब किंग्स (Kings) यांच्यात मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर आयपीएलचा (IPL) 2022 चा 11 वा सामना सुरु आहे. पंजाबने नाणेफेक गमावून पहिले फलंदाजी केली आणि निर्धारित षटकांत 180 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. सीएसकेने आपले पाच फलंदाज अवघ्या 36 धावांवर गमावले. गेल्या वर्षीच्या ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाड याच्यापासून चेन्नईच्या विकेट पडण्याचे सत्र सुरु झाले. त्यानंतर कर्णधार रवींद्र जडेजा आणि धाकड अष्टपैलू मोईन अली देखील भोपळा न फोडता पॅव्हिलियनमध्ये परतले. पंजाबचा सर्वात यशस्वी गोलंदाज आतापर्यंत नवोदित वैभव अरोरा (Vaibhav Arora) ठरला ज्याने रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) आणि मोईन अली (Moeen Ali) याच्या महत्वपूर्ण विकेट घेतल्या. यादरम्यान सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न असेल आणि तो म्हणजे सीएसकेच्या धुरंधर फलंदाजांवर वर्चस्व गाजवलेला हा युवा खेळाडू आहे तरी कोण?

आयपीएलच्या महा लिलावात 2 कोटींची बोली आकर्षित केलेला आणि चेन्नईचे कंबरडं मोडणाऱ्या वैभव अरोराबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

1. 24 वर्षीय वैभव अरोराचा जन्म 14 नोव्हेंबर 1997 रोजी झाला. हा खेळाडू उजव्या हाताने गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. स्विंग गोलंदाजी हे त्याचे प्रमुख बलस्थान आहे.

2. वैभवने 2019-20 रणजी ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. यानंतर, त्याने 2020-21 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये टी-20 डेब्यू केले. त्याच वेळी लिस्ट ए करिअरची सुरुवात गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीदरम्यान झाली.

3. वैभवने हिमाचल प्रदेशसाठी 2020-21 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 6 सामन्यात 10 बळी घेतले. यानंतर चांगली कामगिरी करणाऱ्या या आश्वासक गोलंदाजाला अनेक संघांकडून ट्रायलसाठी बोलावण्यात आले आणि आयपीएल 2021 लिलावात KKR ने 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

4. वैभवने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 8 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 6/48 अशी सर्वोत्तम गोलंदाजी करत 29 बळी घेतले आहेत. लिस्ट ए मध्ये असताना त्याने 5 मॅचमध्ये 8 विकेट्स आणि 12 टी-20 मॅचमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत.