आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

भारतीय कसोटी संघाचे माजी सलामीवीर आणि विद्यमान क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामापूर्वी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. आकाश चोप्राने नवीन आयपीएल (IPL) संघ सामील करू शकतील अशा क्रिकेटपटूंची नावे जाहीर केली आहेत. आयपीएल 2022 पासून क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी टी-20 स्पर्धा 8 नव्हे तर 10 संघांमध्ये खेळली जाणार आहे. लखनौ (Lucknow) आणि अहमदाबादचे (Ahmedabad) संघ देखील या टी-20 लीगचा भाग बनणार आहेत. अशा परिस्थितीत मेगा लिलावापूर्वी विद्यमान आठ संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. तर लखनौ आणि अहमदाबाद संघांना लिलावात उतरलेल्या खेळाडूंमधून जास्तीत जास्त तीन खेळाडू निवडण्याची संधी आहे, जे दोन भारतीय आणि एक परदेशी खेळाडू असू शकतात. (IPL 2022 Costliest Player: एमएस धोनी-विराट कोहली नव्हे, रिटेन्शन शर्यतीत ट्रिपल 'R'चा दबदबा... आयपीएल लिलावापूर्वी ‘हे’ ठरले सर्वात महागडे खेळाडू)

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले पंजाब किंग्ज सोबत साथ सोडल्यानंतर केएल राहुल (KL Rahul) लखनऊ संघात दिसू शकतो आणि तो संघाचा कर्णधारही असेल असा अंदाज वर्तवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार लखनौ टीम 20 कोटी रुपयांमध्ये राहुलला आपल्या ताफ्यात सामील करण्याचा विचार करत आहे. याशिवाय अहमदाबाद संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) असू शकतो असे मत चोप्रा यांनी वर्तवले आहे, ज्याला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केले. अय्यरकडे या स्पर्धेचे नेतृत्व करण्याचा अनुभव असून त्याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघाने 2020 मध्ये आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. दरम्यान, चोप्रा यांनी लखनौमध्ये परदेशी खेळाडू म्हणून राशिद खानची भर घातली आहे, तर दुसरा भारतीय म्हणून लखनौचा संघ यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशनचे नाव समोर ठेवले आहे.

दुसरीकडे, अहमदाबादसोबत श्रेयसशिवाय ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नरही सामील होण्याची शक्यता आहे. वॉर्नरला खराब हंगामामुळे सनरायझर्स हैदराबादने बाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय लेग-स्पिनर युजवेंद्र चहलही अहमदाबादच्या संघात सामील होण्याची शक्यता चोप्रा यांनी व्यक्त केली आहे, कारण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने फटाफट फॉरमॅटमध्ये मजबूत गोलंदाज असलेल्या चहलला कायम ठेवलेले नाही.