(Photo Credits: IPL)

क्रिकेटप्रेमींना आयपीएल च्या 14 (IPL 14) व्या सीजनचे वेध लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2021 हे भारतात होणार असून त्यासाठी सहा ठिकाणं निश्चित करण्यात आल्याचं बीसीसीआयने (BCCI) सांगितलं होतं. यंदाच्या आयपीएलचे सामने वानखेडे (Wankhede), ब्रेबॉर्न स्टेडियम (Brabourne Stadium), डी. वाय, पाटील स्टेडियम (DY Patil Stadium), रिलायन्स क्रिक (Reliance Cric) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसियेशन (Maharashtra Cricket Association) या मैदानांवर रंगणार आहेत. आयपीएलचे अंतिम फेरीतील सामन्यांसाठी मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियम वापरले जावू शकते. नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्टनुसार, आयपीएल चे 14 वे सीजन 11 एप्रिल 2021 पासून सुरु होईल. तर अंतिम सामने 5 किंवा 6 जून रोजी पार पडतील.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  InsideSport  ला दिलेल्या माहितीनुसार, विजय हजारे ट्रॉफी आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेनंतर आयपीएलला सुरुवात होईल. भारत आणि इंग्लंड मधील सामने मार्च महिन्यांत संपतील. त्यानंतर आयपीएलसाठी सज्ज होण्यास इंग्लंडच्या खेळाडूंना पुरेसा वेळ मिळेल. 11 एप्रिल 2021 ही आयपीएल सुरु होण्याची तारीख ठरवली असली तरीही अद्याप याबद्दलचा अंतिम निर्णय झालेला नाही. (IPL 2021 Auction Date: आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी या दिवशी चेन्नई येथे होणार खेळाडूंचा लिलाव)

दरम्यान, खेळाडूंना कोविड-19 ची लस मिळावी यासाठी बीसीसीआय सरकारसोबत चर्चा करत आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे कोषाध्यक्ष अरुणसिंग धुमाळ यांनी सांगितले की, भारत वगळता इतर कुठेही आयपीएल खेळवण्याचा आमचा विचार नाही.

आयपीएलचा 13 सीजन कोरोना व्हायरस संकटामुळे ऑक्टोबर 2020 मध्ये रंगला. या मुंबई इंडियन्स ने बाजी मारत 5 व्यांदा आयपीएलची ट्रॉफी पटकावली. तर आतापर्यंतच्या आयपीएलच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स ने तिनदा, कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा, राजस्थान रॉयर्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांनी प्रत्येकी 1 वेळा विजेतेपदाचा मान पटकावला आहे.