सुनील नारायण (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021, RCB vs KKR Eliminator: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर (Royal Challengers Bangalore) 4 विकेटने दणकेबाज विजय मिळवून आयपीएल जेतेपदाची दिशेने आगेकूच सुरूच ठेवली आहे. आरसीबीला  (RCB) पहिले फलंदाजी करून 138 धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तरात केकेआरसाठी  (KKR) बॉलनंतर बॅटने सुनील नारायणने (Sunil Narine) जबरा खेळ करून संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. नारायणने पहिले चार विकेट घेतल्या. तर बॅटने 15 चेंडूत 26 धावांचे योगदान दिले. तसेच शुभमन गिलने 29 आणि व्यंकटेश अय्यरने 26 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, केकेआरविरुद्ध पराभवासह कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सचा यंदाच्या आयपीएलमधून पॅकअप झाला आहे. आरसीबीसाठी मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. (IPL 2021, RCB vs KKR Eliminator: सुनील नारायणने मोडलं RCB चं कंबरडं, KKR साठी IPL प्लेऑफमधील सर्वात मोठा विक्रम केला आपल्या नावे)

आरसीबीने समोर ठेवलेल्या 139 धावांचा पाठलाग करण्यासाठी व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिलची सलामी जोडी मैदानात उतरली होती. दोघांनी आक्रमक पवित्रा घेत संघाला जोरदार सुरुवात करून दिली असताना आरसीबीचा आघाडीचा गोलंदाज हर्षल पटेलने गिलला बाद केले. केकेआरने काही वेळाच्या अंतरात दुसरी विकेटही गमवली.  केकेआरचा राहुल त्रिपाठी आरसीबीच्या चहलच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर सुरुवातीपासून उत्तम फलंदाजी करत संघाचा डाव सांभाळणारा सलीमीवीर अय्यर स्वस्तात बाद झाला. अय्यर बाद झाल्यावर पाचव्या स्थानावर आलेल्या नारायणने पहिल्या चेंडूपासून आपला इरादा स्पष्ट केला. नारायणने खेळपट्टीवर येताच आपली स्फोटक शैली दाखवली आणि डॅन ख्रिश्चनच्या षटकात तीन षटकार ठोकले. या दरम्यान संघ विजयाच्या नजीक पोहोचला असताना नितीश राणा चहलच्या गोलंदाजीवर डिव्हिलियर्सकडे झेलबाद झाला. मोक्याच्या क्षणी सिराजने नारायणची महत्वपूर्ण विकेट काढली आणि संघा मोठा दिलासा दिला. त्यानंतर सिराजने 12 चेंडूत 10 धावांवर दिनेश कार्तिकला पॅव्हिलियनमध्ये धाडले.

दरम्यान, शारजाहच्या मैदानात झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात विजेता केकेआर संघ आता दिल्ली कॅपिटल्ससोबत अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दुसरा क्वालिफायर सामना खेळेल तर पराभूत झालेला आरसीबी संघ थेट स्पर्धेबाहेर पडला आहे. यासह एकही आयपीएल ट्रॉफी न जिंकता विराट कोहलीच्या आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून प्रवास संपुष्टात आला आहे. विराटने स्पर्धेपूर्वीच पुढील वर्षांपूर्वी आरसीबीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता.