IPL 2021: अरेरे! 2 दुखापतग्रस्त तर अन्य दोघांची माघार, Rajasthan Royals संघाच्या ताफ्यात आता उरले फक्त 4 विदेशी क्रिकेटपटू
जयदेव उनाडकट (Photo Credit: Twitter/@IPL)

Rajasthan Royals 2021 Squad: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघासाठी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चं सत्र संकटाचा ठरताना दिसत आहे. जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांच्या दुखापतींनंतर लियम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने बायो-बबलला कंटाळून स्पर्धेतून माघारी घेतली आहे. आणि आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे कारण त्यांचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू टाय (Andrew Tye) आयपीएलच्या (IPL) उर्वरित हंगामापासून बाहेर पडला आहे. टाय आता रॉयल्सच्या संघातून बाहेर पडणारा चौथा खेळाडू आहे. लिविंगस्टोनने बबलचं कारण म्हणून घरी परत प्रवास केला. रविवारी सकाळी टाय ऑस्ट्रेलियाचा रवाना झाला. दरम्यान, हे सर्व खेळाडू संघातून आयपीएलच्या मध्यातून बाहेर पडल्यामुळे राजस्थान संघात आता फक्त चार विदेशी खेळाडू शिल्लक आहे. (IPL 2021: भारतात वाढत्या COVID-19 ची विदेशी खेळाडूंमध्ये दहशत, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीगमधून घेणार एक्झिट)

शनिवारी हंगामातील आपला दुसरा विजय नोंदविल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना 29 एप्रिल रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. क्रिस मॉरिस, जोस बटलर, डेविड मिलर आणि मुस्तफिजुर रहमान या इलेव्हनचा भाग आहे तर आता त्यांच्या परदेशी खेळाडूंच्या स्लॉटमध्ये कमतरता आहे. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर ड्यूसेन लवकरच रॉयल्सच्या संघ सामील होणार आहे आणि तो भारत प्रवास करण्यासाठी व्हिसा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. तथापि, याबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी झाली नसून रॉयल्सकडे आता उर्वरित हंगामासाठी मर्यादित स्त्रोत आहेत. आयपीएल 2018 मधील पर्पल कॅप विजेत्या टायने 2019 मध्ये पंजाब किंग्ससाठी 6 सामने खेळला त्यानंतर तो 1 कोटीच्या बेस प्राईसवर राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला. त्याने युएई येथे आयपीएल 2020 मध्ये फक्त एक सामना खेळला. त्याने 50 धावा केल्या आणि एक विकेटही घेतली. असे असूनही फ्रँचायझीने त्याला आयपीएल 2021 मध्ये रिटेन केले होते.

दरम्यान, रॉयल्सची यंदाचं मोसमात अडखळत सुरुवात झाली आहे. त्यांनी पाच सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत तर सलग तीन पराभवानंतर शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवत राजस्थान रॉयल्स विजयपथावर परतले. विशेष म्हणजे यंदाच्या मोसमासाठी भारताचा युवा संजू सॅमसनकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.