IPL 2021: इंग्लंड संघाचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) सोशल मीडियावर आपले मत मांडण्यात मागे-पुढे पाहता नाही. इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर असताना देखील वॉन यांनी अनेकदा रोखठोक आपले मत मांडले आहे. या दरम्यान त्यांनी अनेकदा आयपीएल (IPL) फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सदस्य खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले आहेतच पण आयपीएलमध्ये यंदा विजेतेपदाच्या हॅटट्रिकसाठी देखील मुंबईला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, आयपीएलच्या आजच्या पहिल्या डबल-हेडर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) 38 धावांनी शानदार विजय मिळवला. आरसीबीच्या सलग तिसऱ्या विजयात ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांनी मोलाचा वाटा उचलला. मॅक्सवेलच्या बॅटिंगने चाहत्यांनांच नाही तर वॉन यांना देखील प्रभावित केले ज्यांनी मोठी भविष्यवाणी केली. (IPL 2021 Points Table Updated: सलग तिसऱ्या विजयासह RCB ची अव्वल स्थानी झेप, KKR ची घसरण)
वॉन यांनी आरसीबीला मागील अनेक वर्षातील एक परिपूर्ण संघ म्हणून संबोधले आणि विजयासाठी समर्थन केले. माजी इंग्लिश कर्णधाराने म्हटले की आरसीबी आयपीएल विजेता बनू शकतो पण नॉकआउट्समध्ये त्यांना पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सचा अडथळा दूर करावा लागणार आहे. “बर्याच वर्षांपासूनच हे सर्वोत्तम संतुलित आरसीबी आहे... हे त्यांचे वर्ष असू शकते!!! नॉकआउट्समध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला तरच!” असं ट्विट वॉन यांनी आरसीबीच्या सलग तिसऱ्या आयपीएल विजयानंतर केले. रॉयल चॅलेंजर्ससाठी आजच्या सामन्यासाठी विजय विशेष ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरोधात आजच्या सामन्यातील विजयामुळे संघाने पहिल्यांदा स्पर्धेत सलग तीन सामने जिंकले आहेत.
This is best balanced @RCBTweets for many many years .... Could this be the year !!!! Only if they beat @mipaltan in the knockouts !!!! #DoubtIt #IPL2021
— Michael Vaughan (@MichaelVaughan) April 18, 2021
दरम्यान, सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2021 मधे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या ग्लेन मॅक्सवेलचा सध्याचा फॉर्म चर्चेचा विषय ठरला आहे. माजी क्रिकेटपटूंपासून जगभरातील क्रिकेटप्रेमींपर्यंत प्रत्येकजण मॅक्सवेलच्या स्ट्रोकप्लेने मंत्रमुग्ध झाले आहे. आयपीएल 2020 मॅक्सवेलसाठी खराब सिद्ध झाले होते, मात्र यंदा त्याने मागील अनेक सामन्यांची कसर भरून काढली आहे. चेन्नईमध्ये एमए चिदंबरम स्टेडियमवर, जेथे बहुतेक फलंदाजांना धावा करणे कठीण झाले तिथे मॅक्सवेलने सहज फलंदाजी करत अर्धशतकी कामगिरी केली. इतकंच नाही तर 32-वर्षीय मॅक्सवेलने सध्या आयपीएलची ऑरेंज कॅप देखील पटकावली आहे.