IPL 2021 Playoffs: युएई येथे इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 च्या हांगाच्या प्लेऑफमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यापूर्वीच प्लेऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत. तर अंतिम आणि चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गतविजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या 13 सामन्यात दोघांचे 12 गुण आहेत त्यामुळे आता प्लेऑफमध्ये कोणता चौथा संघ उडी घेतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आज प्लेऑफच्या दिशेने जाण्यासाठी राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) भिडणार आहे. राजस्थान अंतिम चार संघाच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी ते मुंबईसाठी गेमचेंजर ठरू शकतात. केकेआर (KKR) आणि राजस्थानच्या सामन्याचा गुणतालिकेवर फारसा परिणाम होणार नसला तरी जर केकेआरने सामना जिंकला तर मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. (IPL 2021 Playoffs Race: एमएस धोनीची चेन्नई आणि रिषभ पंतच्या दिल्ली संघात रंगणार Qualifier 1 चा ‘महासंग्राम’)
इयन मॉर्गनचा केकेआर सध्या नेट रनरेटमुळे चौथ्या स्थानासाठीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. दुसरीकडे मुंबईच्या आशा अद्यापही टिकून आहेत. आजच्या होणाऱ्या दोन सामन्यांपैकी राजस्थानविरुद्ध सामन्यात कोलकाताने विजय मिळवल्यास त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. कोलकाताचा विजय झाल्यास अगदीच अनपेक्षित कामगिरीच्या जोरावर मुंबईला अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याची फारच धुरस संधी उपलब्ध असेल. राजस्थान विरोधात केकेआरने त्यांचा अंतिम लीग स्टेजमधील सामना जिंकला आणि सनरायझर्स हैदराबादने मुंबईला पराभूत केले तर केकेआर प्लेऑफ मध्ये जाणारा चौथा संघ ठरेल. तसेच केकेआरला आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही पण सनरायझर्सने मुंबईला पराभूत केले तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावरील संघांचे गुण समान राहतील. अशा स्थितीत रनरेटने चौथ्या संघाचा निर्णय होईल. केकेआरसाठी चांगली बातमी ही आहे की सध्या चौथ्या स्थानासाठी झगडणाऱ्या चार संघांमध्ये त्याचं नेट रनरेट सर्वात उत्तम आहे. त्यामुळे केकेआर प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे.
अशा स्थितीत तीन वर्षात पहिल्यांदा आयपीएलचा पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स प्लेऑफ फेरीत पोहचण्यात अपयशी ठरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई ‘पलटन’ची कामगिरी काही त्यांना साजेशी राहिली नाही. भारतात आयोजित लीगच्या पहिल्या टप्प्यात ते आपले अधिक सामने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जिथे त्यांची निराशनजक कामगिरी राहिली. याशिवाय अनेक मात्तबर खेळाडू विशेषतः फलंदाज सध्या लयीत नसल्याचा फटका मुंबईला बसला आहे. त्यामुळे आता केकेआर विरुद्ध राजस्थान सामन्याच्या निकालावर मुंबईचे भवितव्य अवलंबून आहे.