IPL 2021 Playoffs Race: एमएस धोनीची चेन्नई आणि रिषभ पंतच्या दिल्ली संघात रंगणार Qualifier 1 चा ‘महासंग्राम’, चौथ्या क्रमांकासाठी KKR-मुंबई इंडियन्समध्ये काट्याची टक्कर
एमएस धोनी, रिषभ पंत (Photo Credit: Facebook)

IPL 2021 Playoffs Race: आयपीएल 2021 (Indian Premier League) च्या मोसमात अखेर सनरायझर्स हैदराबादच्या पदरी आणखी एका विजयाची भर पडली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध अबू धाबी येथे झालेल्या रंगतदार सामान्य त्यांनी 4 धावांनी विजय मिळवला आहे. हैदराबादने दिलेल्या 142 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीचा बेंगलोर संघ 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 137 धावाच करू शकला. देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 41 रन केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 25 बॉलमध्ये 40 रनची आक्रमक खेळी केली. दुसरीकडे, हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर, सिद्धार्थ कौल, उमरान अकमल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान हैदराबादचे यंदाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न आधीच भंग झाले आहे. तर आरसीबीची (RCB) आधीच प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) क्वालिफाय झाली असली तरी पहिल्या दोन संघात स्थान मिळवण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. तसेच आता प्लेऑफचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. (IPL 2021 Points Table Updated: RCB vs SRH रंगतदार आयपीएल सामन्यानंतर पाहा पॉईंट टेबलची स्थिती)

रविवारपासून प्लेऑफची सुरुवात होणार आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 10 ऑक्टोबर रोजी पहिला क्वालिफायर सामना रंगणार असून यामध्ये तीन वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गेल्या वर्षाचे उपविजेते दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. प्लेऑफमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या संघांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी एक अधिक संधी मिळते. अशास्थितीत हैदराबादविरुद्ध पराभवामुळे आरसीबीला टॉप-2 मध्ये येणं आता कठीण झाल्यामुळे त्यांना एलिमिनेटरसह (Eliminator) दुसरा क्वालिफायर (Qualifier 2) सामना देखील खेळावा लागू शकतो. सर्व संघांचे आता अंतिम सामने शिल्लक आहेत त्यामुळे शेवटच्या सामन्यात आरसीबीचा विजय झाला आणि चेन्नईचा पराभव झाला तरीदेखील नेट रनरेटमुळे चेन्नई दुसऱ्या आणि आरसीबी तिसऱ्या क्रमांकावरच राहिल.

दुसरीकडे, बेंगलोर तिसऱ्या क्रमांकावर ठामपणे बसले असून चौथ्या क्रमांकासाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि गतविजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. केकेआर आणि मुंबई सध्या 13 सामन्यात एकूण 12 पॉईंटसह गुणतालिकेत अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे. याशिवाय दोघांचा अंतिम सामना शिल्लक असताना अखेरची बाजी कोणता संघ मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचे प्लेऑफ शर्यतीतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.