IPL 2021 in UAE: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 हंगामाचा दुसरा भाग सुरु होणार आहे आणि यंदा काही नवीन चेहरे स्पर्धेत दाखल झाले आहेत. एप्रिलमध्ये सुरु झालेल्या हंगामात विविध संघांचा भाग असलेले अनेक परदेशी खेळाडू 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या दुसऱ्या भागात सहभागी होत नाहीत. अशा स्थितीत संघांनी त्यांची जागा भरण्यासाठी अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे. त्यातील बहुतांश लोक पहिल्यांदा आयपीएलमध्ये आपले स्थान निर्माण करणार आहेत. या खेळाडूंवर एक नजर टाकूया जे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये आपला दम दाखवण्यासाठी उत्सुक असतील. भारतात कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) दुसऱ्या लाटेमुळे आयपीएल (IPL) 2021 हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला होता. तथापि आता यूएईमध्ये (UAE) 19 सप्टेंबरपासून या हंगामातील उर्वरित सामने खेळण्याची तयारी केली जात आहे. यासाठी सर्व फ्रँचायझी त्यांच्या बहुतेक खेळाडूंसह तिथे पोहोचले आहेत. (IPL 2021: किती हे दुर्दैव! लिलावात 8.5 कोटींमध्ये विकला गेलेले वेस्ट इंडियन आज बनला नेट गोलंदाज, एका चुकीमुळे हिरोचा झाला झिरो)
वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga)
श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू वानिंदु हसरंगाने अलीकडेच भारताविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अॅडम झांपाच्या जागी स्थान दिले आहे. हसरंगा पहिल्यांदा आयपीएल खेळणार आहे. युजवेंद्र चहलच्या रूपात आरसीबीकडे चांगले फिरकीपटू असले तरी हसरंगाची अलीकडची कामगिरी पाहून त्याचे पदार्पण जवळपास निश्चित दिसत आहे. हसरंगाने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 63 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 83 विकेट घेण्यासह 770 धावा केल्या आहेत.
ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips)
आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीचा सर्वात मोठा परिणाम राजस्थान रॉयल्सला बसला आहे. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर या संघाचे तीनही प्रमुख परदेशी खेळाडू यंदा खेळत नाही आहे. राजस्थानने बटलरच्या जागी न्यूझीलंड यष्टीरक्षक-फलंदाज ग्लेन फिलिप्सचा समावेश केला आहे. फिलिप्स या फॉरमॅटमध्ये वेगाने वाढणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे, जो अतिशी फलंदाजीने षटकारांसह मोठे फटके खेळू शकतो. संघात चांगल्या परदेशी फलंदाजांची कमतरता आहे आणि फिलिप्स ती चांगली भरून काढू शकतो. 24 वर्षीय फिलिप्सने 144 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 142 च्या स्ट्राइक रेटने 3998 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 शतके देखील केली आहेत.
टिम डेव्हिड (Tim David)
RCB ने अनेक नवीन खेळाडूंना करारबद्ध केले आहे, त्यापैकी सर्वात धक्कादायक नाव टिम डेव्हिडचे आहे. सिंगापूरच्या या आक्रमक फलंदाजाने अलीकडेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टी-20 ब्लास्टपासून कॅरेबियन प्रीमियर लीगपर्यंतच्या विविध स्पर्धांमध्ये डेव्हिडने मधल्या फळीत जोरदार फलंदाजी केली. आरसीबीकडे परदेशी फलंदाजांचा पूर्ण कोटा आहे त्यामुळे संघ त्याला संधी देते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. डेव्हिडने एकूण 62 टी -20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 153 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 1468 धावा केल्या आहेत.
एडन मार्करम (Aiden Markram)
दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमला अलीकडेच पंजाब किंग्सने जागतिक क्रमवारीत नंबर वन टी-20 फलंदाज डेविड मलानच्या जागी संघात स्थान दिले आहे. मार्करमने यंदा दक्षिण आफ्रिकेसाठी या फॉरमॅटमध्ये दणक्यात पदार्पण केले. मार्करम एक आक्रमक फलंदाज आहे आणि एक उपयुक्त ऑफ स्पिनर आहे. त्याने 59 टी -20 सामन्यांमध्ये सुमारे 128 च्या स्ट्राईक रेटने 1424 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 12 विकेट्सही घेतल्या आहेत. पंजाब किंग्जसाठी परदेशी अष्टपैलूची भूमिका बजावून तो एका बाणाने दोन लक्ष्य साधू शकतो.
नॅथन एलिस (Nathan Ellis)
बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत पदार्पणाच्या सामन्यात हॅट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला पंजाब किंग्ज संघाने आपल्या संघात घेतले आहे. तो संघात त्याचाच देशाचा सहकारी रिले मेरेडिथची जागा घेईल.