IPL 2021: किती हे दुर्दैव! लिलावात 8.5 कोटींमध्ये विकला गेलेले वेस्ट इंडियन आज बनला नेट गोलंदाज, एका चुकीमुळे हिरोचा झाला झिरो
IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

गेल्या दशकभरात अनेक क्रिकेटपटूंनी आयपीएलच्या (IPL) माध्यमातून आपले नशीब बदलले आहे. चेतन साकरिया, हर्षल पटेल किंवा अगदी क्रिस मॉरिस यांनी करोडोंची कमाई केली आहे. परंतु असे काही लोक आहेत जे संधींचे पुरेपूर उपयोग करू शकले नाहीत आणि त्यांना दरवाजा दाखवला गेला. असेच काहीसे वेस्ट इंडिज (West Indies) आणि आयपीएलच्या पंजाब किंग्सचा (Punjab Kings) वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell) याच्यासोबत घडले. कॉटरेल, जो गेल्या वर्षी 8.5 कोटी रुपयांत विकला गेला होता परंतु एका हंगामानंतर कोणत्याही संघाने विकत घेतले नाही आणि युएई येथे होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL Phase-2) तो आता नेट गोलंदाज म्हणून सामील झाला आहे. 2019 विश्वचषकात कॉट्रेलने तब्बल 12 विकेट्स चटकावल्या होत्या. त्याच्या या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याला जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 मध्ये संधी मिळाली होती. पंजाब संघाने 8.50 लाखांच्या मोठ्या किंमतीला त्याला विकत घेतले होते. परंतु शारजाहमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या साखळी फेरी सामन्याने कॉट्रेलच्या नशिबाचे ग्रह फिरले आणि तो रातोरात हिरोचा झिरो झाला.

राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू राहुल तेवतियाने एकाच सामन्यात कॉटरेलची आयपीएल कारकीर्द खराब केली. 2020 च्या हंगामात कॉटरेलने सहा आयपीएल सामने खेळले आणि सहा विकेट्स घेतल्या. पण त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात मोठे नुकसान राहुल तेवतियामुळे झाले. कॉटरेलच्या गोलंदाजीवर रॉयल्सच्या तेवतियाने एकाच षटकात पाच षटकार ठोकले. या घटनेनंतर कॉटरेलची आयपीएल कारकीर्द एका प्रकारे संपुष्टातच आली. परिस्थिती इतकी वाईट झाली की या हंगामात तो आयपीएलमध्ये नेट गोलंदाज म्हणून सामील झाला. याशिवाय आयपीएल 2021 मध्ये नेट गोलंदाज म्हणून समाविष्ट झालेल्या कॉटरेलला वेस्ट इंडीज टी-20 वर्ल्ड कप संघात देखील राखीव खेळाडू ठेवण्यात आले आहे. कॉटरेल व्यतिरिक्त, 36 वर्षीय वेगवान गोलंदाज रवि रामपॉल देखील आयपीएल 2021 मध्ये नेट गोलंदाज म्हणून दिसेल. रामपॉल यापूर्वी आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघाकडून खेळला आहे, परंतु या मोसमासाठी कोणत्याही संघाने या दोन खेळाडूंना खरेदी केले नाही.

कॉटरेल, रामपॉल यांना वगळता वेस्ट इंडिजचे गोलंदाज डॉमिनिक ड्रेक्स, फिडेल एडवर्ड्स यांनाही अलीकडील अहवालानुसार इंडियन प्रीमियर लीगच्या युएई लेगमध्ये नेट गोलंदाज म्हणून सामील करण्यात आले आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग 2021 मध्ये रामपॉलने आतापर्यंत सर्वाधिक 18 विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर रामपॉलला विंडीजच्या टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. तसेच 39 वर्षीय वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्स 9 वर्षानंतर विंडीज टी-20 संघात परतला आहे. डोमिनिक ड्रेक्सला आयपीएल 2021 मध्ये नेट गोलंदाज म्हणून जोडले गेले आहे. सीपीएल 2021 मध्ये सेंट किट्सकडून खेळणाऱ्या ड्रेक्सने एकूण 13 विकेट्स घेतल्या आहेत आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.