IPL 2021: इंग्लंडविरुद्ध (England) पहिल्या वनडे सामन्यात फिल्डिंग दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यासाठी भारतीय संघातून बाहेर पडावे लागले आहेत. शिवाय, इंडियन प्रिमीयर लीगच्या (Indian Premier League) 14व्या आवृत्तीत देखील त्याच्या खेळण्यावर साशंकता बनली आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलचा (IPL) थरार सुरु होणार आहे तर श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध 10 एप्रिल रोजी आयपीएलच्या आपल्या सलामीच्या सामन्यात आमने-सामने येतील. श्रेयस अय्यरच्या दुखापतीचा भारतीय संघालाच नव्हे तर दिल्ली कॅपिटल्स संघाला देखील फटका बसला आहे. अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे यंदा आयपीएलचे अनेक सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे, श्रेयस संपूर्ण आयपीएलला मुकल्यास दिल्ली कॅपिटल्स संघात त्याची जागा घेण्यासाठी तीन मजबूत दावेदार आहेत. (IPL 2021: आयपीएल 14 साठी Shreyas Iyer फिट झाला नाही तर, कॅप्टन्सी भूमिकेसाठी Delhi Capitals कडे आहेत ‘हे’ 5 पर्याय)
हनुमा विहारी (Hanuma Vihari)
जखमी श्रेयस अय्यरच्या जागी आंध्र प्रदेशचा अष्टपैलू विहारीचा दिल्ली संघात समावेश होऊ शकतो. विहारीकडे आयपीएल खेळण्याचा अनुभवही आहे. देशाच्या या प्रतिष्ठित स्पर्धेत 24 सामन्याच्या 23 डावात 14.2 च्या सरासरीने 284 धावा केल्या आहेत. फलंदाजीबरोबरच तो आपल्या गोलंदाजीनेही संघासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
विष्णू सोलंकी (Vishnu Solanki)
या यादीत बडोदाचा स्टार फलंदाज विष्णू सोलंकीचे नाव दुसर्या क्रमांकावर आहे. सोलंकीने महत्त्वपूर्ण कामगिरी करत घरगुती क्रिकेटमध्ये फलंदाजीने मोक्याच्या क्षणी चांगल्या धावा केल्या आहेत. सोलंकीने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 41 सामन्यात 35.1 च्या सरासरीने 807 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर चार अर्धशतके देखील आहेत.
हिमांशू राणा (Himanshu Rana)
भारतीय अंडर-19 संघाचा भाग असलेल्या हरियाणाच्या 22 वर्षीय हिमांशू राणाला यंदा एकही खरेदीदार मिळाला नाही. हरियाणाकडून 32 टी-20 सामने खेळताना त्याने 24.37 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये त्याने सहा अर्धशतके देखील केली आहेत. शिवाय नुकत्याच संपुष्टात आलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या संघासाठी अनेक महत्त्वाचे डाव खेळले. अशास्थितीत हिमांशुला जर दिल्ली संघात स्थान मिळाले तर तो निश्चितच संघासाठी फायदेशीर ठरेल.