IPL 2021 मध्ये खेळणार Devon Conway? WTC फायनल सामन्यात टीम इंडियाची डोकेदुखी ठरलेला किवी फलंदाज या 3 संघाच्या रडारवर
डेव्हन कॉनवे (Photo Credit: Instagram)

IPL 2021 in UAE: न्यूझीलंडचा डावखुरा सलामी फलंदाज डेव्हन कानवेने (Devon Conway) अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केले. न्यूझीलंडमध्ये (New Zealand) त्याने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात पदार्पण केले तर इंग्लंडमध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. इंग्लंडच्या लॉर्ड्स येथे कसोटी पदार्पण करत कॉनवेने विक्रमी द्विशतकी खेळी केली आणि सिद्ध केले की तो तीनही फॉर्मेटचा खेळाडू आहे. कॉनवे आता किवी संघाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि असा विश्वास आहे की न्यूझीलंडचा हा तडाखेबाज खेळाडू आयपीएल (IPL) 2021 च्या दुसर्‍या टप्प्यात खेळताना दिसू शकतो. युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना खेळणे अवघड दिसत आहे तर किवी खेळाडू उपलब्ध होऊ शकतात. अशा परिस्थितीत आता न्यूझीलंडचा हा खेळाडू बदली म्हणून खालील नमूद केलेल्या फ्रँचायझींच्या रडारवर असेल. (IPL 2021: युएई येथे आयपीएल 14 च्या दुसर्‍या लेगमधून हे 10 मोठे खेळाडू होतील टूर्नामेंट मधून गायब)

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

राजस्थान रॉयल्स संघात इंग्लंडचेही चांगले खेळाडू असून त्यांची दुसऱ्या टप्प्यात युएई येथे खेळण्याची शक्यता कमीच आहे. रॉयल्ससाठी जोस बटलर नसणार आहे त्यामुळे त्याच्या जागी संघात कोनवेचा समावेश करण्याबाबत फ्रँचायझी निश्चितपणे विचार करू शकते. कॉनवे एक चांगला सलामीवीर आहे आणि ही वस्तुस्थिती त्याची आकडेवारी देखील सिद्ध करते.

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)

कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इयन मॉर्गन देखील आयपीएल 2021 च्या दुसर्‍या टप्प्यात खेळताना दिसणार नाही, त्यामुळे या संघाला एक चांगला अनुभवी फलंदाजाची गरज असेल. नाईट रायडर्सची सलामी जोडी देखील फ्लॉप ठरली आहे, त्यामुळे कॉनवे शाहरुख खानच्या संघाची गरज पूर्ण करू शकतो.

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंची अनुपस्थिती सनरायझर्स हैदराबाद संघावर भारी पडणार आहे. हैदराबादचे सर्वात महत्वाचे खेळाडू जॉनी बेयरस्टो आणि डेविड वॉर्नर दुसर्‍या टप्प्यात खेळताना दिसणार नाहीत. अशा परिस्थितीत हैदराबादला चांगला सलामी फलंदाजाची गरज असेल आणि कॉनवे त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.

डेव्हन कॉनवे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही अशा फलंदाजांपैकी एक आहे ज्यांची सरासरी तीनही स्वरूपात 50 पेक्षा जास्त आहे. कसोटी क्रिकेटमधील कॉनवेची सरासरी 63.16 आहे. एकदिवसीय सामन्यात त्याचे सरासरी 75 आहे, तर टी-20 मध्ये त्याची सरासरी 59.12 आहे. तसेच, कॉन्वेने 95 टी-20 सामन्यांत 43.80 च्या सरासरीने 3154 धावा केल्या असून यामध्ये दोन शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.