IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: रुतुराज-उथप्पाचे दणकेबाज अर्धशतक; सुपर किंग्सची नवव्या फायनलमध्ये एन्ट्री, सलग तीन पराभवानंतर चेन्नईची गाडी रुळावर
रुतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा (Photo Credit: PTI)

IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) या जोडीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दुबई येथे पहिल्या क्वालिफायर सामन्यात रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) पराभवाचा जोरदार झटका दिला आणि आयपीएलच्या नवव्या फायनल सामन्यात एन्ट्री घेतली. तीन वेळा आयपीएल (IPL) विजेता सुपर किंग्ससाठी गायकवाडने 49 चेंडूत 70 धावांची ताबडतोड खेळी केली. तर उथप्पाने 44 चेंडूत 63 धावांचे योगदान दिले. तसेच मोईन अलीने 16 धावा केल्या आणि धोनी 18 धावा करून नाबाद परतला. या सोबतच चेन्नईने आपल्या सलग तीन पराभवाची मालिका देखील खंडित केली. दिल्लीने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात चेन्नईने 19.4 षटकात विजयीरेष ओलांडली. दुसरीकडे साठी गोलंदाजीत टॉम कुरनने (Tom Curran) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर एनरिच नॉर्टजे आणि आवेश खानने प्रत्येकी 1 गडी बाद केला. (IPL 2021, RCB vs KKR Eliminator: प्लेऑफपूर्वीच KKR ला जोर का झटका, लीग फेरी संपताच स्टार अष्टपैलूने संघ सोडण्याचा घेतला निर्णय)

दिल्लीने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये नॉर्टजेने सीएसकेचा अनुभवी सलामीवीर फाफ डु प्लेसिसला त्रिफळाचित करून संघाला पहिले यश मिळवून दिले. तथापि यानंतर रुतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांनी सूत्रे हाती घेत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उथप्पा सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी करत होता तर गायकवाडने संयमी फलंदाजी करून त्याला साथ दिली. यादरम्यान उथप्पाने 35 चेंडूत अर्धशतक झळकावलं. यानंतरही त्याने आपला गियर बदलला आणि दिल्ली गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोघांच्या शतकी भागीदारीने दिल्ली त्रस्त झाला होता. याच वेळी टॉम कुरनने उथप्पाला 63 धावांवर असताना श्रेयस अय्यरकडे झेलबाद करून दोघांची भागीदारी मोडली. यानंतर चेन्नईने शार्दूल ठाकूर आणि अंबाती रायुडूची सलग दोन विकेट गमावली. मोक्याच्या शमी मोईन अली देखील चुकीचा फटका खेळून माघारी परतला. पण धोनीने दिल्लीच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आणि थरारक विजय मिळवला.

दुसरीकडे, दिल्लीसाठी यापूर्वी पृथ्वी शॉने 60 आणि कर्णधार रिषभ पंतने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. संघ अडचणीत असताना पंत आणि शिमरॉन हेटमायरच्या भागीदारीने संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास मोलाची भूमिका बजावली. चेन्नईविरुद्ध या पराभवांनंतर गेल्या वर्षीचे उपविजेता दिल्ली कॅपिटल्स आता 13 ऑक्टोबर राय होणारा दुसरा क्वालिफायर सामना खेळतील. आरसीबी आणि केकेआर यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ पंत आणि कंपनीशी भिडेल.