Ashwin-Morgan Verbal Spat in IPL 2021: मॉर्गनशी झालेल्या वादावर अश्विनने तोडले मौन; टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर
रविचंद्रन अश्विन आणि इयन मॉर्गन (Photo Credit: Twitter/DC, Instagram)

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार बॉलर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) त्याच्या क्रीडाप्रकारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्वांना चोख उत्तर दिले. इंडियन प्रीमियर लीगच्या  (Indian Premier League) 41 व्या सामन्यात अश्विन आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) मैदानावरच भिडले. कोलकाताचा क्षेत्ररक्षक राहुल त्रिपाठीने थ्रो फेकला जो दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला (Rishabh Pant) लागल्यानंतर चेंडू दुसरीकडे गेला तेव्हा वादाला सुरुवात झाली. त्यानंतर अश्विनने दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न केला. मॉर्गनला हे खेळाच्या भावनेअंतर्गत नाही असे वाटले आणि अश्विनला टीम साऊदीने (Tim Southee) बाद केल्यावर त्याला हे सांगितले. अश्विन सुद्धा खूप आक्रमक पद्धतीने काहीतरी बोलताना दिसला आणि यानंतर दिनेश कार्तिकने मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यानंतर मॉर्गनने अश्विनवर टीका करण्यासाठी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आणि त्याला ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचाही पाठिंबा मिळाला.

रविचंद्रन अश्विनने अलीकडेच शारजाहमध्ये आयपीएल सामन्यादरम्यान त्याच्या आणि केकेआर जोडी इयन मॉर्गन आणि टीम साउथी यांच्यातील भांडणाबद्दल उघड स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय ऑफ-स्पिनरने ट्विटरवर त्याच्या टीकाकारांवर हल्ला केला ज्यांनी त्याच्या खेळ भावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अश्विनने ट्विट केले आणि लिहिले की त्याने असे काही केले नाही जे क्रिकेटच्या नियमांच्या विरोधात होते. “1. मी ज्या क्षणी क्षेत्ररक्षकाला बॉल फेकताना पहिले तेव्हा मी धाव घ्यायला पळालो आणि चेंडू रिषभला लागला होता हे मला समजले नाही. 2. जर मी ते पाहिले तर मी धावतो का?! नक्कीच मी करीन आणि मला परवानगी आहे. 3. मॉर्गनने सांगितल्याप्रमाणे मी बदनामी आहे का? नक्कीच नाही,” अश्विनने ट्विटच्या मालिकेतुन म्हटले. अश्विनने शेवटच्या ट्विटमध्ये लिहिले की, मैदानावर मनापासून आणि खेळाच्या नियमांनुसार खेळा आणि खेळ संपल्यावर हात मिळवणी करा, कारण मला खेळाची भावना समजते.

दरम्यान, या घटनेनंतर शेन वॉर्नसारख्या माजी क्रिकेटपटूंनी अश्विनला या प्रकरणात दोषी ठरवत त्याच्यावर हल्ला चढवला. वॉर्न आणि “क्रिकेटची भावना” यावर स्पष्टीकरण देताना अश्विन म्हणाला की याहून आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की लोक त्यावर चर्चा करत आहेत आणि इथे चांगले आणि वाईट कोण आहे याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, मी तुम्हाला सांगतो की क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूने सांगितले की, जेव्हा त्याने क्षेत्ररक्षकाला पाहिले तेव्हाच तो सिंगलसाठी धावला, पण चेंडू पंतच्या शरीरावर लागला होता याची त्याला कल्पनाही नव्हती.